वाळू माफीयांचे धाबे दणाणले ; पंधरा ब्रास वाळूच्या साठ्यासह 20 लाखाचा जेसीबी जप्त
संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथे महसूल विभागाची कारवाई 
संगमनेर | लोकवेध live न्यूज 
संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील प्रवरानदी पात्रात अवैधरित्या वाळूचा उपसा होत असल्याची माहिती मिळताच महसूल विभागाने मोठी कारवाई करत जेसीबीसह १५ ब्रास वाळूचा साठा जप्त केला आहे.ही कारवाई  ३० एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास केली आहे. अंदाजे २० लाख रूपये किंमतीचा जेसीबी आहे.
याबाबत महसूल विभागाने दिलेली माहिती अशी की, खांडगाव येथील प्रवरानदी पात्रात चेतन साकुरे हा जेसीबीच्या माध्यमातून अवैधरित्या वाळूचा उपसा करत असल्याची माहिती गुप्त खबर्‍यामार्फत नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांना समजली होती. त्यामुळे रविवारी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्यांच्यासह तलाठी रामदास मुळे, बाबासाहेब नरवडे, युवराजसिंग जारवाल हे सर्वजण वरील ठिकाणी गेले. यावेळी महसूल पथकाला पाहून चालक हा जेसीबी घेऊन पळून चालला होता. मात्र महसूल पथकाने पाठलाग करुन जेसीबी पकडला आहे.त्यानंतर हा जेसीबी संगमनेर येथील पोलिस वसाहतीत आणून लावला आहे.
त्याच बरोबर जेसीबीच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात वाळूचा साठा करून नदीपात्रालगच ढीग लावण्यात आला होता. आज सोमवार( ता.१) मे रोजी महसूल पथकाने प्रवरानदी पात्रात जावून उत्खनन केलेल्या वाळूचा पंचांच्या समक्ष पंचनामा केला आहे. अंदाजे वीस लाख रूपये किंमतीचा हा जेसीबी आहे. त्याच बरोबर वाळूची वाहतूक करणारे वाहने वाळूतस्करांनी घटनास्थळावरुन पळून नेली आहे. त्यामुळे नेमकी किती वाहने होती ते मात्र समजू शकले नाही. तसेच महसूल पथक या वाहनांवर कारवाई करणार आहे का? हे पाहणे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे.
संगमनेर तालुक्यात तीन ठिकाणी महसूल मंत्र्यांची आढावा बैठक
दोन दिवसांपूर्वी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तळेगाव दिघे, घारगाव संगमनेर खुर्द या तिन्ही ठिकाणी आढावा बैठकी घेतल्या होत्या या बैठकींमध्ये ना. विखे पाटील यांनी तलाठी, सर्कल यांना पुढे बोलावून तुमच्या हद्दीत गौणखनिजासह वाळू वाहतूक आढळून आल्यास तुमची जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल असा सज्जड दम ना.विखे पाटील यांनी दिला होता. त्यामुळे महसूल अधिकारी खडबडून जागे झाले आणि त्यांनी ही धडक कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!