वरूडी फाट्यावर माऊली इलेक्ट्रिकलचे दूकान अज्ञात चोरट्यांनी फोडले
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील नाशिक – पुणे महामार्गावरील वरूडी फाट्यावर असलेल्या माऊली इलेक्ट्रिकलच्या दूकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी दूकानातील साहित्यांची उचकापाचक करून दूकानातील वायरींसह साहित्य चक्क दुकानासमोरच गाडी लावून भरत असल्याची धक्कादायक घटना मंगळवार दि. २३ मे २०२३ रोजी मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान घडलीय.
याबाबत अधिक माहिती अशी की, नानासाहेब भोसले हे साकूर जवळील बिरेवाडी येथील रहिवासी आहेत. त्यांचे साकूर व वरूडी फाट्यावर असे दोन ठिकाणी माऊली इलेक्ट्रिकलचे दूकान आहे. सोमवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे अमोल भोसले यांनी दूकान बंद करून बिरेवाडी येथे घरी गेले होते. परंतु मंगळवारच्या मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान अज्ञात दोन चोरट्यांनी दूकानासमोर कार लावून दूकानातील वायरींसह साहित्य भरत असताना गुंजाळ वाडी येथील रविंद्र भोर यावेळी तेथून जाताना त्यांना दूकान एवढे उशीरा का चालू आहे हे बघण्यासाठी दूकानाजवळ जाऊन बघितले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर चोरट्यांनी गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला गाडीखाली दगड अडकल्याने गाडी सोडून अंधाराचा फायदा घेत चोरटे तेथून पळून गेले.
चोरट्यांनी प्रत्येकी १२ हजार रुपयांचे ५ वायर बंडल तसेच २० हजार रुपयांची अंदाजे ३० किलो जुनी स्क्रॅप वायर गाडीत टाकली होती. मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसलाय. घारगाव पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सदर गाडी ताब्यात घेऊन चोरलेले साहित्य परत दिले आहे. सदर गाडी आता पोलिसांनी ताब्यात घेतली असून चोरीचा तपास लवकर लागण्यास मदत मिळणार आहे. तर याबाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार आदिनाथ गांधले करत आहेत.
