मृग नक्षत्र कोरडेच ; खरीपाची पेरणी लांबली बळीराजा हवालदिल !

मुग, उडीद, तूर, कापूस पिकाला फटका

अंबाजोगाई / लोक वेध live न्यूज / सुरेश मंत्री 

 

यंदाही पावसाचा अंदाज चुकल्याने खरीपासाठी लाभदायक असलेले मृग नक्षत्र जवळपास कोरडे गेले. त्यामुळे मुग, उडीद, तूर, कापुस इत्यादी खरीप पिकाला फटका बसला असून बळीराजा पावसाच्या प्रतिक्षेत पुन्हा नेहमीप्रमाणे नभाकडे डोळे लावून अक्षरश: चिंताग्रस्त झाला आहे.
गेल्या दोन वर्षात अंबाजोगाई तालुक्यात वेळेवर पाऊस पडला होता यावर्षी मात्र पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी वर्गाची झोपच उडाली आहे. या जून महिन्यात आठ तारखेला लागलेले मृग नक्षत्र अद्याप पावसाअभावी कोरडे जाताना दिसू लागल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. त्यामुळे तालुक्यात खरीपाच्या पेरण्या आता लांबण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. शेतकरी सांगतात की, मृग नक्षत्रात पडणारा पाऊस हा कापूस, मुग, उडीद, तूर यासारख्या नगदी पिकासाठी उपयुक्त ठरत असतो. मात्र यंदा पावसाळा लागुन पंधरा दिवस लोटले तरी पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे शेतकरी पावसाची वाट पाहून पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे. एक महिन्यापूर्वीच शेतकरी काक-या, पाळ्या घालून जमिनीची मशागत करुन आकाशाकडे डोळे लावून पावसाच्या प्रतिक्षेत होता, परंतू यंदाही मृगाच्या पावसाने ओढ दिल्यामुळे प्रत्येकाच्या चेह-यावर निराशा दिसू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!