तेलंगणाणे दिला महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना आधार , महाराष्ट्र सरकार करतंय काय ?
भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघेनासा झाला.
महाराष्ट्र / लोकवेध live न्यूज

महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी हा कांदा पिकाला भाव नसल्यामुळे अडचणीत सापडला आहे. कवडीमोल भावाने कांदा हा शेतकऱ्यांना विकावा लागत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा पिकवण्यासाठी आलेला खर्चही त्यामधून निघत नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीला तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव धावून आले.
रक्ताचं पाणी अन् हाडाची काडं करून पिकवलेला कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांवर आली. कारण येथे त्यांना भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्चही निघेनासा झाला. अशा परिस्थितीत के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष कांदा उत्पादकांसाठी धावला आहे.
महाराष्ट्रातील काही ठिकाणचा कांदा हा आता तेलंगणा राज्यातील व्यापारी घेत आहेत. तसेच चांगला दरही मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू बघायला मिळत आहे. यासंदर्भात भारत राष्ट्र समितीचे समन्वयक बी. जे. देशमुख यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचा कांदा बाजारात आल्यानंतर कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. शेतकरी देशोधडीला लागलेला आहे.
कांदा उत्पादकांच्या अवस्थेकडे सत्ताधारी व विरोधकांचे लक्ष नाही. भारत राष्ट्र समितीचे नेते माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी व इतर नेत्यांनी कांदा दराबाबत चौकशी केली तर हैदराबादमध्ये साधारण कांद्याला १७०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. तर महाराष्ट्रात केवळ ३०० ते ४०० रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन के. चंद्रशेखर राव व त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती केली आणि त्यांनी या गोष्टीला सकारात्मक दृष्टीने बघून त्यांचे व्यापारी महाराष्ट्रात पाठवून येथील काही कांदा खरेदी केला आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम तेलंगणा सरकारने केला आहे. ज्या महाराष्ट्रात शंभर लाख मॅट्रिक टन कांद्याचे उत्पादन होते. महाराष्ट्रातील शेतकरी देशोधडीला लागलेला असताना महाराष्ट्रातील सरकार शेतकऱ्यांबाबत उदासीन असल्याचा आरोपही देशमुख यांनी केला.
