प पू गगनगिरी महाराज विद्यालयात वृक्षदिंडी व फळझाडांची रोपे देऊन गुणवंत विद्यार्थी सत्कार
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
सामाजिक वनीकरण विभाग संगमनेर आणि परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय पंपरणे यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी व फळझाडांची रोपे देऊन गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
सामाजिक वनीकरण विभागाच्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर सौ.सोनाली गिरी तसेच वनक्षेत्ररक्षक स्मिता अत्रे ,ताई भरीतकर या कार्यक्रमास उपस्थित होत्या.
विद्यार्थी व विद्यार्थिनी वारकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये या कार्यक्रमात सहभागी झाले होते .गुणवंत विद्यार्थ्यांना आंबा, चिंच ,जांभूळ, पेरू ,सीताफळ इत्यादी फळझाडांची रोपे देण्यात आली. याप्रसंगी रेंज फॉरेस्ट ऑफीसर सौ.सोनाली गिरी यांनी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय व पंढरपूरच्या वारीची माहिती दिली. यामागील सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व साध्या सोप्या शब्दात विद्यार्थ्यांना सांगितले. इयत्ता नववी दहावीच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी स्वतंत्रपणे संवाद साधला. ग्रामीण भागातील विद्यार्थी सुद्धा चांगले यशस्वी करिअर करू शकतात याचे स्वतःच्या उदाहरणाने समजावून सांगितले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य मुकुंद डांगे यांनी जलतपस्वी परमपूज्य गगनगिरी महाराज यांनी पर्यावरण संवर्धनासाठी दिलेली शिकवणूक विद्यार्थ्यांसमोर ठेवली. बदलत जाणारे सृष्टीचक्र, हवामान यातील प्रदूषण व बिघडणारा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धनाचे महत्त्व विशद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री ललित शेळके सरांनी केले. या कार्यक्रमात विद्यार्थी व विद्यार्थिनी उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.
अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांवर पर्यावरण संवर्धनाची मूल्ये रुजवली जातात अशी प्रतिक्रिया रेंज फॉरेस्टऑफीसर सौ.सोनाली गिरी यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सामाजिक वनीकरण विभागाच्या वनरक्षक श्रीमती मीनाक्षी खेमनर यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.
