महसूल सेवा सप्ताह जोमात, शेतकरी मात्र कोमात !
सप्ताहात तक्रारींचा पाढा, खरे लाभार्थी वंचित
संगमनेर / लोकवेध live न्यूज
– संगमनेरात महसूल सप्ताहाच्या दिवशीच अनेक शेतकन्यांनी तक्रारींचा पाढाच वाचल्याने नक्की महसूल सप्ताह कुणासाठी हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तसेच अनेकांना या कार्यक्रमाचे निमंत्रण नसल्याने नाराजी व्यक्त केली.
शुक्रवारी (दि. ४) शहरात यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनात महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धीराम सालीमठ यांच्यासह स्थानिक प्रांताधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते. मात्र, जाणूनबुजून स्थानिक महसूल प्रशासनाने अनेकांना कार्यक्रमाचे निमंत्रणच दिले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेक शेतकऱ्यांनी गमे यांना महसूलच्या चुकांसंदर्भात तक्रारींचा पाढाच वाचून दाखवला. त्यामुळे संगमनेर- अकोले तालुक्यातील शेतकरी मात्र महसूल विभागावर नाराज असून, महसूलचे कर्मचारी चुकीचे काम करत असल्याचे दाखवून दिले.
व्यापक अभियानातून विशेष मोहिमेद्वारे नागरिकांचे
प्रश्न सोडवितानाच विभागाचे लोकाभिमुख काम गतिमान करण्याचा संकल्प असून, या अभियानात प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरिकांनी सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहनही महसूलमंत्र्यांनी केले होते. मात्र, याठिकाणी अनेकांना निमंत्रण नसल्याचे जाणवले. सप्ताहाचे आयोजन केवळ शासकीय स्वरूपाचे न करता या माध्यमातून आपल्या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा लोकांशी संवाद कसा होईल, असा प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते.
मात्र, या कार्यक्रमात फक्त १० टक्केच लोक आले, तर ९० टक्के नागरिक घरीच आहेत. त्यांना या योजनेबद्दल काहीच माहिती नाही. तसेच हा कार्यक्रम शहरात घेण्याऐवजी गावागावात घेतला, तर प्रभावी ठरेल, असे शेतकऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत कधीच महसूल कार्यालयांची स्वच्छता झाली नसेल तेवढी आजच्या निमित्ताने झाल्याचे दिसून आले. रोज प्रशासकीय भवनात इतरत्र गुटखे खाऊन पिचकाऱ्या मारलेल्या दिसतात. परंतु महसूल सप्ताहाच्या निमित्ताने स्वच्छ झाले. परंतु स्वच्छतागृहे आत जाण्यालायक नव्हते.
नुकसानधारकच भरपाईपासून वंचित !सन २०२१-२२मध्ये माळेगाव पठार गावात आलेल्या निधीत तलाठी कार्यालयात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाला आहे. या निधीवाटपाची चौकशी व्हावी, तसेच पठार भागात प्रत्येक गावात नुकसानभरपाई व पंचनाम्यात महसूल विभाग आणि कृषी विभाग भेदभाव झालेला आहे. ज्यांचे खरोखर नुकसान झाले आहे त्यांनाच वंचित ठेवण्यात आले आहे.
माझ्या शेतात तलाठी आणि त्यांच्या हाताखाली काम करणारा व्यक्ती पंचनामा करण्यासाठी आले होते. त्या वेळी त्यांनी सांगितले की, सोयाबीनची नुकसानभरपाई मिळत नाही. मात्र, इतर शेतकऱ्यांना सोयाबीनची भरपाई मिळाली, तसेच कांद्याचेही नुकसान झाले. मात्र, आम्हाला १२ हजार ९०० रुपये आले आणि ज्यांचे कांदेच नाही त्या शेतकऱ्यांना १७ हजार हेक्टरी पैसे मिळाल्याने आम्ही काय करावे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.एक शेतकरी माळेगाव पठार
