भरड धान्य : काळाची आवश्यकता

लोकवेध live न्यूज

संयुक्त राष्ट्रांच्या सर्व साधारण सभेने २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. पंतप्रधानांची दूरदृष्टी आणि पुढाकारामुळेच हा संयुक्त राष्ट्रांचा ठराव जगभरातील ७० हून अधिक राष्ट्रांच्या पाठिंब्याने स्वीकारला गेला. शाश्वत शेतीमध्ये भरड धान्याची महत्त्वाची भूमिका तसेच स्मार्ट आणि सुपरफूड म्हणून त्याचे फायदे याबद्दल जगभरात जागरूकता निर्माण करण्यात त्यामुळे मदत होईल. भरड धान्ये सुमारे १३१ देशांमध्ये घेतली जातात. आशिया आणि आफ्रिकेतील सुमारे ६० कोटी लोकांचे हे पारंपरिक अन्न आहे. आशियातील ८०% पेक्षा जास्त भरड धान्याचे उत्पादन भारतात होते. १७० लाख टनांहून अधिक उत्पादनासह भारत भरड धान्याचे जागतिक केंद्र बनण्याच्या तयारीत आहे.
ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळ, राजगिरा भादली अशी ७-८ तरी भरड धान्ये आहेत. भरड धान्यांमध्ये खूप पोषकतत्त्वे आहेत. भरड धान्यांमध्ये प्रथिने- १२ टक्के, फॅट २-५ टक्के, कर्बोदके ६५ -७५ टक्के, तर १५-२० टक्के तंतूमय पदार्थ असतात. याशिवाय त्यात भरपूर अँटिऑक्सिडंट आहेत. इतर क्षार व जीवनसत्त्वेसुद्धा मुबलक आहेत. भरड धान्ये पचायला हलकी आहेत म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी तर ही फारच उत्तम. आपल्या जेवणातही विविधतेची गरज आहे. त्यामुळे ती रोज वापरायलाही हरकत नाही. त्याने पोटात आम्ल तयार होत नाही. उलट ते प्रोबायोटिकसारखे काम करते. भरड धान्य खाण्याने रक्तातील शर्करा कमी होत जाते ज्याने हृदयरोगाची संभावना टळते. सर्वच भरड धान्यांमध्ये भरपूर तंतूमय पदार्थ आहेत. हे पदार्थ खाल्यास आपल्या शरीरातील अन्नाचा पचनाचा काळ वाढवण्यात मदत होते. ही सर्व धान्ये कमी ते जास्त पावसाच्या प्रदेशात, हलक्या ते कमी प्रतीच्या जमिनीतही उगवतात. हे धान्य कोरडवाहू शेतीसाठी उत्तम पर्याय आहे. भरड धान्यांना निरोगी धान्ये म्हटले जाते, म्हणजेच या पिकांचे वैशिष्टय़ म्हणजे या पिकांसाठी कोणत्याही वरखतांची आवश्यकता नसते. यावर कोणतीही कीटकनाशके, बुरशीनाशके वापरावी लागत नाहीत.
मानवाने सर्वात सुरुवातीला घेतलेल्या पिकांपैकी एक असलेल्या भरड धान्याला एक वैभवशाली इतिहास आहे. देशात हरितक्रांती होण्यापूर्वी व नंतर भरडधान्य हे भारतीयांच्या आहारातील महत्वाचे अन्न होते. परंतु कालानुरूप ते कमी कमी होत गेले. तीळ किंवा करडी काढणे किती नाजूकपणाचे वा टोकाचे कष्टाचे असते, हे ग्रामीण भागातील लोक सांगू शकतील. भुईमूग पेरणे सोपे असते, पण शेंगा वेचणे कष्टाचे असते. त्यात मटकी, मूग, उडदाचे, कारळ्याचे, बाजरीचे पीक कमी निघत असे. हायब्रिड अर्थात संकरित ज्वारी रंगाने काळी असल्याने आणि सकस नसे, दरही कमी मिळायचा. त्यात ‘कुशल’ मजूर मिळेनासे झाले. शेतकरी नगदी पिकांकडे वळला आणि कमीत कमी श्रमिकांवर अवलंबून राहता येईल अशी पिके घेऊ लागला. सध्या किती टक्के शेतकरी खरिपात पिवळी, बाजरी, हुलगे, राळे, भगर, राजगिरा, कारळे, अंबाडी, तीळ ही पारंपरिक पिकं घेतात? तीच बाब रब्बी पिकांबद्दल; किती टक्के शेतकरी ज्वारी, करडी, मसूर ही पिके घेतात. जर शेतीत एकच एक धान्य पिकत असेल तर जमिनीच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. आपल्या जेवणातही विविधतेची गरज आहे. भरड धान्य हे भूतकाळात अन्नाचा एक महत्वाचा स्त्रोत होतेच. भविष्यातील खाद्यपदार्थ म्हणून त्याची निवड करणे ही आजच्या काळाची गरज आहे. आमच्या आहारातील मुख्य घटक ज्वारी हा होता आता तो दुय्यम झालेला आहे. गेल्या काही वर्षांत खाद्यसंस्कृती ही सामाजिक स्थानाशी जोडली गेली आहे. ज्वारीच्या भाकरी गरीब खातात, असे आता खेड्यातही रूढ झाले आहे. आता खेड्यातील मुलेसुद्धा डब्याला चपात्या, सॉरी पोळ्या नेतात आणि आता खेड्यातसुद्धा पाच मिनिटांत तयार होणाऱ्या आयत्या शेवया आणि पास्ता मिळू लागलेला आहे. देशात पिझ्झा, बर्गर सारखे जंक फुड खाण्याची सवय तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना परदेशात मात्र ज्वारी, नाचणी, बाजरीला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात अनेक देशांनी भारतातून १०१ कोटी रुपयांचे भरड धान्य आणि ४८० कोटी रुपयांचे बाजरीचे बियाणे आयात केले आहे.
भरड धान्य उत्पादनामुळे अर्थव्यवस्था आणि पर्यावरणावर सकारात्‍मक प्रभाव पडू शकेल. भरड धान्याविषयी अनुकूल जनमत तयार करण्यासाठी जनजागृती करणे हा या चळवळीचा महत्त्वाचा भाग आहे. संस्था आणि व्यक्ती यात मोठे योगदान देऊ शकतात. संस्थात्मक यंत्रणा भरड धान्ये उत्पादनाला प्रोत्साहन देऊ शकतात आणि धोरणात्मक उपक्रमांद्वारे शेतकऱ्यांना फायदा मिळवून देऊ शकतात. सध्या अनेक छोट्या कंपन्या, स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत ज्वारी, बाजरी, रागी या भरड धान्यांपासून चिप्स, कुकीज, नूडल्स आदी लोकप्रिय खाद्यपदार्थ तयार केले जातात. तर मोठ्या कंपन्यांची विक्री, वितरण व्यवस्था चांगली असल्याने या स्वयंसेवी संस्थांना मोठ्या कंपन्यांनी साह्य करावे. निर्यातीसाठीही मोठ्या कंपन्यांनी प्रयत्न करावेत. त्यामुळे या भरडधान्यांचा खपही वाढेल आणि त्यांची मूल्यसाखळीही निर्माण होईल व ती धान्ये मुख्य प्रवाहात येतील. आता भरड धान्ये आपल्या नेहमीच्या आहाराचा एक भाग व्हावा यासाठी बहुराष्ट्र कंपन्यांचे प्रयत्न जरुरी आहेत. व्यक्तिगत पातळीवर आपण आपल्या आहारात भरड धान्याचा समावेश करत, एक आरोग्यदायी आणि पर्यावरण स्नेही आयुष्य जगण्याची निवड करु शकतो. देशात आहाराच्या स्तरावर पाहण्यास मिळत असलेला विरोधाभास दूर व्हावा. संपूर्ण देश सुदृढ, निरोगी होण्यासाठी गरिबांच्या पोटाला पौष्टिक अन्न मिळाले पाहिजे. केंद्राने राज्यांच्या साहाय्याने गरीब जनतेपर्यंत भरड धान्यांच्या माध्यमातून पोषक, चौरस आहार मिळवून देण्याविषयी ठोस निर्णय घ्यावा. गरिबांसाठी ही एक प्रकारची मेजवानी असेल. शिधावाटप केंद्रावर तांदूळ, गहू अल्पदरात मिळतात. त्यात भरड धान्याची भर पडली तर गरिबांच्या चेहऱ्यावरील समाधान अनमोल असेल. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष-२०२३ जगाच्या सुरक्षित, शाश्वत आणि निरोगी भविष्यासाठी लोक चळवळ सुरू करेल, असा मला विश्वास वाटतो.


सुरेश मंत्री, अंबाजोगाई.

संपर्क- ९४०३६५०७२२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!