*महाराष्ट्राने एक असा वारसदार गमावला आहे ज्याने कष्टालाच आपली खरी ओळख मानले*

अजित पवार यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीचे विश्लेषण करताना स्पष्टवक्तेपणा व बेधडकपणा
हे शब्द सर्वात आधी समोर येतात. राजकारणात जिथे गोड बोलून कामे काढण्याची आणि शब्दांना फिरवण्याची कला अवगत असावी लागते, तिथे अजितदादांनी नेहमीच ‘रोखठोक भूमिकेला प्राधान्य दिले. त्यांचा हा स्वभाव जितका त्यांच्या समर्थकांसाठी ‘प्रामाणिकपणाचे’ लक्षण होता, तितकाच तो विरोधकांसाठी आणि प्रसंगी जनतेसाठी ‘वादाचा’ विषय ठरला.
“जे आहे ते तोंडावर” जे पोटात तेच ओठावर या वृत्तीमुळे त्यांनी कधीही शब्दांवर साखर पेरली नाही. मग ते एखाद्या अधिकाऱ्याला सभेमध्ये सुनावणे असो किंवा कार्यकर्त्याची कानउघडणी करणे दादांच्या भाषेतील गावरानपणा आणि बेधडकपणा अनेकदा टीकेचे लक्ष ठरला. त्यांच्या राजकीय प्रवासात काही अशी विधाने आली, ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे वादळ उठवले. दुष्काळाच्या संदर्भात त्यांनी केलेले एक विधान त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात वादग्रस्त आणि कठीण काळ ठरला. त्या एका विधानामुळे त्यांना प्रचंड टीकेचा सामना करावा लागला आणि अखेर त्यांनी आत्मक्लेश ही केला मात्र, या वादांच्या पलीकडे जाऊन पाहिले तर हा स्पष्टवक्तेपणा,हे घाव दोन तुकडे या म्हणी प्रमाणे त्यांच्या प्रशासकीय यशाचे गुपितही होता. मंत्रालयातील फाईल्स अडवून ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना “उद्याच्या उद्या काम झाले पाहिजे, नाहीतर गाठ माझ्याशी आहे,” असे ठणकावून सांगणारे दादाच होते. राजकारणात ‘हो’ ला ‘हो’ म्हणणारे अनेक असतात, पण एखादे काम होणार नसेल तर ते “होणार नाही” असे सांगण्याचे धाडस केवळ अजितदादाकडे होते. त्यांच्या या स्वभावामुळे लोकाचा वेळ वाचायचा आणि प्रशासनाला स्पष्ट दिशा मिळायची.
दादांच्या भाषेत कधीकधी ‘मुजोरपणा’ भासत असल्याचा आरोप विरोधकांनी वारंवार केला, पण त्यांचे समर्थक त्याला ‘दादांची जरब’ म्हणत. राजकारणातील मुत्सद्दीपणा बाजूला सारून त्यांनी आपल्या स्वभावातील नैसर्गिक तिखटपणा कधीही सोडला नाही. वादांचे वलय त्यांच्याभोवती कायम राहिले, परंतु त्यांनी कधीही आपले व्यक्तिमत्व बदलण्याचा प्रयत्न केला नाही. आज त्यांच्या निधनानंतर, हाच स्पष्टवक्तेपणा ,बेधडकपणा त्यांच्या आठवणीमधील एक अविभाज्य भाग म्हणून मागे राहिला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील हा ‘कडू पण गुणकारी’ आवाज आता कायमचा शांत झाला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात ‘घराणेशाही’ हा शब्द अनेकदा टीकेच्या अर्थाने वापरला जातो, परंतु वारसा मिळणे आणि तो वारसा कष्टाने टिकवून वृद्धिंगत करणे यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रबळ राजकीय घराणी कार्यपद्धतीची तुलना केली असता, अजित पवार यांची ‘कर्तव्यदक्षता’ ‘वक्तशिरपणा’ प्रकर्षाने अधोरेखित होतो.
अजितदादांनी कधीही पवार नाव वापरून केवळ पदे उपभोगली नाहीत. त्यांनी साखर कारखान्याच्या संचालक पदापासून ते राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास स्वतःच्या कार्यक्षमतेवर केला. पहाटे पाचला उठून “सात वाजता जनसंपर्क आणि प्रशासकीय बैठका सुरू करण्याची त्यांची पद्धत ही आळसावलेल्या राजकारण्यांसाठी मोठी चपराक होती.
अजितदादा कधीही केवळ भाषणांवर विसंबून राहिले नाहीत दुष्काळ असो वा पूर, दुर्घटना प्रत्यक्ष जाऊन लोकांशी संवाद साधताना दिसत.विकास कामांचे लोकार्पण करताना अनेकदा कॉन्ट्रॅक्टर व संबधीत अधिकाऱ्यांना कामातील चुका लक्षात आणून देत कार्यवाही करत.अजित पवारांच्या बाबतीत तर असे म्हटले जाते की, त्यांनी स्वतःला कामात इतके झोकून दिले होते की बारामतीचा तसेच ग्रामीण भागातील जलसंपदा विभागाच्या माध्यमातून कामांना डेडलाईन देत प्रकल्प पूर्ण करून विकास कामांना गती देणे असो वा पिंपरी-चिंचवडचा कायापालट, त्यात त्यांच्या वैयक्तिक परिश्रमाचा वाटा सिंहाचा होता. वारसा मिळाला तरी तो ‘आळसावून’ घालवायचा नसतो, तर ‘घामातून’ अधिक समृद्ध करायचा असतो, राजकारण हे केवळ ‘इव्हेंट’ नसून ती निरंतर चालणारी जनसेवा आहे, हे दादांनी त्यांच्या कामातून दाखवून दिले.
अजितदादा पवार यांच्या अकाली निधनानंतर, महाराष्ट्राने एक असा वारसदार गमावला आहे ज्याने कष्टालाच आपली खरी ओळख मानले होते. वारसा हक्काने मिळालेली गादी त्यांनी कष्टाच्या जोरावर ‘सिंहासनात’ रूपांतरित केली होती.अशा कर्तबगार लोकनेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली.

*आशिष तानाजी कानवडे*
(सिव्हील इंजि./गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर)
संगमनेर जि.-अहिल्यानगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!