देशात संवैधानिक मूल्यांच्या समोरच गंभीर आव्हान उभे – नितीन वैद्य

शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर दहाव्या स्मृती विशेषांकाचे प्रकाशन.

 

निमगाव जाळी / लोकवेध live न्यूज / अशोक गोसावी  

“गांधीना मारून जसा गांधीवाद मरत नाही तसेच दाभोलकरांना मारून दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ उभारत विज्ञानवादाची जी पायाभरणी केली आहे, तीही उखडता येणार नाही, उलट अंधश्रद्धा निर्मूलनाची
चळवळ व्यापक होत दिवसेंदिवस ही पायाभरणी पक्की होताना दिसत आहे.” असे उद्गगार राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, चित्रपट निर्माते नितीन वैद्य यांनी अंधश्रद्धा निर्मूलन
वार्तापत्राच्या डॉ. नरेंद्र दाभोलकर दहाव्या स्मृती विशेषांकाचे ऑनलाइन प्रकाशन करताना काढले.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विविध आठवणी सांगत आपल्या भाषणात अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ केवळ भूत, भानामती, बुवाबाजीविरोधापुरती नसून ती स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक
दृष्टिकोन आणि लोकशाही या मूल्यांच्यासाठी संघर्ष करणारी संघटना आहे, “ही मूल्य परिवर्तनाच्यासाठी कृतिशील संवाद साधणारी संघटना आहे.” असे दाभोलकर म्हणत असे सांगून पुढे ते म्हणाले, “आज आपल्या देशात याच संवैधानिक मूल्यांच्यासमोरच गंभीर आव्हान उभे राहिलेले आहे. अशा कठीण परिस्थितीत नवनवीन येणाऱ्या तंत्रज्ञानाचा, माध्यमांचा वेध घेऊन त्याचा अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वापर कसा करता येईल याचा विचार करून तो अंमलात आणणे हीच डॉ. दाभोलकरांना त्यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त खरी आदरांजली ठरेल.”

२० ऑगस्ट २०२३ ला दाभोलकरांच्या खुनाला दहा वर्षे होत आहेत, त्या निमित्ताने डॉ. दाभोलकरांच्या खुनामागच्या सूत्रधारांच्या शोधाचा खटला सीबीआयने बंद करता कामा नये अशी मागणी या स्मृतिदिनानिमित्त आपण केली पाहिजे असे सांगून दहाव्या स्मृतिदिनानिमित्त राज्यभरात होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जागर आपण सर्वानी मिळून करूया असे आवाहन आपल्या भाषणाच्या अखेरीस नितीन वैद्य यांनी सर्व कार्यकर्त्यांना केले.

राज्यभरातून मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या या ऑनलाइन कार्यक्रमाची सुरुवात डॉ. दीपक माने
यांनी गायलेल्या गीत गायनाने केली. अंनिवाचे संपादक राजीव देशपांडे यांनी कार्यक्रमाचे
प्रास्ताविक केले. सहसंपादक अनिल चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले. व्यवस्थापकिय संपादक राहुल थोरात
यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!