वसंत व्याख्यानामालेमार्फत सकारात्मक विचारांचा जागर-
ब्रम्हाकुमारी ममता दिदी
नाशिक / लोकवेध live न्यूज / निलेश शेकोकार
समाजामध्ये वाढत असलेली नकारात्मकता व नैराश्येचे वातावरण दूर करण्याकरिता वसंत व्याख्यानमालेसारख्या संस्थांच्या माध्यमातून होणारा सकारात्मक विचारांचा जागर अव्याहतपणे सुरू राहणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या अहमदाबाद केंद्राच्या संचालिका ममता दिदी यांनी केले.
नाशिक वसंत व्याख्यानमालेच्या शताब्दी वर्षाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ब्रम्हाकुमारी नाशिक केंद्रातर्फे वसंत व्याख्यानमाला पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.
यावेळी बोलताना ममता दिदी म्हणाल्या की, प्रजापिता ब्रम्हाकुमारी केंद्रामार्फत जगभरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचे आणि शांतता व समाधान वाढविण्याचे काम विविध उपक्रमांतून केले जाते. वसंत व्याख्यानमाला देखील असेच काम करीत आहे.
यावेळी बोलताना संस्थेच्या जिल्हा मुख्य सेवाकेंद्र प्रशासिका ब्रम्हाकुमारी वासंती दिदी म्हणाल्या की गेल्या 25 वर्षांपासून वसंत व्याख्यानमालेत ब्रम्हाकुमारी केंद्राच्या विविध तज्ञ व्याख्यात्यांना दरवर्षी आमंत्रित केले जाते. भविष्यात देखील हा ऋणानुबंध कायम राहील.
यावेळी व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, कार्याध्यक्ष प्रा.सौ. संगिता बाफणा, चिटणीस हेमंत देवरे, सहचिटणीस गणेश भोरे, कार्यकारी मंडळ सदस्य विजय काकड, कृष्णा शहाणे, अंतर्गत हिशेब तपासनीस सुनील गायकवाड यांचा वासंती दीदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी राजन राजधर, दिलीप बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केंद्राच्या संचालिका पुष्पा दिदी यांनी केले. यावेळी माजी नगरसेविका वत्सलाताई खैरे, नाशिक शहर महिला काँग्रेस अध्यक्ष स्वाती जाधव, महावीर इंटरनॅशनलचे अध्यक्ष अनिल नहार, राजेंद्र बाफणा आदी उपस्थित होते. यावेळी ब्रम्हाकुमार स्व. जगदिशभाई यांच्या स्मरणार्थ ब्रम्हाभोजन आयोजित करण्यात आले होते.
