आधारच्या मदतीने जीवनात उभीं राहिलेल्या रेश्माने दिला निराधार गरजू मुलांना आधार
संगमनेर / लोकवेध live न्यूज
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवोत्तर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सायखिंडी येथील प्राथमिक शाळेतील आई- वडिलांचे छत्र हरवलेल्या सात मुला-मुलींना रेश्मा मनसुख/शिंदे हिने आधार संस्थेच्या माध्यमातून उत्तम दर्जाची सॅक, दप्तर,वह्या,पेन, कंपास, पाटी-पेन्सिल, रंगपेटी,आदी साहित्य देत या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविला.
खरं तर अकरावीला असताना रेष्माची आई वारली. शिकायला पैसे नसताना आधार फाउंडेशन धावून आलं. दिवसभरात रणखांब ते साकुरचे बारा किलोमीटरचे अंतर पायी जाताना दमछाक व्हायची. आधार फाउंडेशनच्या माध्यमातून मला जुन्या सायकल सोबत वह्या, पुस्तके, सॅक, कपड्यांची व्यवस्था झाल्याने मी शिक्षण घेऊ शकले. एम् कॉम झाले. आज संगमनेर येथील मारुती सुझुकी शोरूम मध्ये अकाऊंटचे काम करून, स्वतःच्या पायावर उभी असणारी रेश्मा सांगत होती.
आधार फाउंडेशनचे सुखदेव इल्हे यांची भेट झाली नसती तर मी आजही दुर्गम असलेल्या रणखांब या गावी मजुरी करीत असते.
रेश्माचे नुकतेच स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भारत सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या नॅशनल फॉरेन्सिक ऍडमिशन टेस्ट मधून त्रिपुरा येथे अकाउंटिंग या पोस्टवर प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.
आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ह्या उदात्त भावनेने रेश्मा मनसुख /शिंदे व तिचे पती योगेश शिंदे यांनी आधार फाउंडेशन कार्यालयात भेट देत स्वतःच्या सायखिंडी गावातील आई-वडील नसलेल्या मुलांना मदत करण्याविषयी इच्छा व्यक्त केली. लगेचच ५०००₹ ऑनलाईन आधार खात्यावर जमा केले.
नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सायखिंडी येथील प्राथमिक शाळेतील मुला-मुलींना पाहुण्यांच्या उपस्थितीत शालेय साहित्याची वाटप करण्यात आले.
गेल्या पंधरा वर्षापासून आधार फाउंडेशनच्या माध्यमातून निरपेक्षपणे अनेक निराधार- गरजू मुलांना शैक्षणिक मदत करत आहे. रेश्माला आधार शैक्षणिक दत्तक पालक योजनेत केलेल्या मदतीमुळे ती आज स्वतःच्या पायावर उभे राहत आहे.आधारने केलेल्या मदतीची जाणीव ठेवत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतोय,या भावनेने तिने केलेली परतफेड ही आपली भारतीय संस्कृती आहे. याच भावनेने आधार फाउंडेशन आजही १६० निराधार मुलांसोबत काम करत आहे.
