पत्रकारिता अभ्यासक्रमातून जाणीवा समृद्ध होतात – डॉ. संजय मालपाणी
संगमनेर / लोकवेध live न्यूज /अण्णासाहेब काळे
आपली भाषा समृध्द असली की जाणीवा समृध्द होतात. संगमनेर महाविद्यालयातर्फे चालवल्या जाणा-या पदव्युत्तर पदविका पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या माध्यमातून केवळ पत्रकारितेचे विविध पैलूंच शिकविले जात नाहीत तर जाणीवा समृध्द केल्या जातात म्हणून पत्रकार होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक, व्यावसायिक, विविध क्षेत्रात कार्यरत असलेले नोकरदार यांनी या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा असे आवाहन शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले. ते संगमनेर महाविद्यालयाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योजक कैलास सोमाणी, महाविद्यालयाचे कार्यकारणी सदस्य मधुसूदन नावंदर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरूण गायकवाड, पत्रकारिता अभ्यासक्रमाचे प्रमुख प्रा. डॉ..संतोष खेडलेकर हे उपस्थित होते.
संगमनेर महाविद्यालयात मागील बारा वर्षांपासून चालविल्या जाणाऱ्या या अभ्यासक्रमात विद्यार्थी, गृहिणी, डॉक्टर्स, पत्रकार, उद्योजक, व्यापारी, शिक्षक, सरकारी अधिकारी अशा विविध स्तरात कार्यरत मराठी भाषाप्रेमी सहभागी होतात व भाषेच्या विविध पैलूंचा अभ्यास करतात. उद्योजक कैलास सोमाणी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकाराची जबाबदारी फार मोठी असते. हा अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडलेल्या पत्रकारांनी समाजातल्या विविध स्तरातील नागरिकांचे हित जोपासणारी पत्रकारिता करावी. प्राचार्य डॉ गायकवाड यांनी सांगितले की, संगमनेर महाविद्यालयातील पुणे विद्यापीठाचा पत्रकारिता अभ्यासक्रम हा महाविद्यालयाच्या लौकिकात भर घालणारा विभाग आहे. यावेळी डॉ. संतोष खेडलेकर यांच्यासह गुणवंत विद्यार्थ्यांची भाषणे झाली.
डॉ. किरण चांडक, नीतिन सूर्यवंशी, अविनाश बोधक, भाऊसाहेब कोटकर, संजय अहिरे, साईसुधा बच्चा, मंगल पेटकर, स्वप्नाली भुतडा – तापडे, अमोल गवांदे, अरविंद गाडेकर, दत्ता शेणकर, मिलिंद औटी, वृषाली कासट, बाळासाहेब बिन्नर, शाम कुलकर्णी आदींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालन पत्रकारिता अभ्यासक्रमाचे समन्वयक प्रा. सुशांत सातपुते यांनी केले.
विद्यार्थ्यांबरोबरच व्यावसायिक, नोकरदार यांच्या सुविधेसाठी दर रविवारी सकाळी संगमनेर महाविद्यालयात चालविलल्या जाणाऱ्या पत्रकारिता अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेचे पदवीधर प्रवेश घेऊ शकतात. इच्छुकांनी प्रा. सुशांत सातपुते यांच्याशी कार्यालयीन वेळेत 9766760926 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ. अरूण गायकवाड यांनी केले आहे.
