प्रत्येक विद्यार्थ्याने किमान दहा शेतकऱ्यांना ई पीक पाहणीसाठी मदत करावी -तहसीलदार मांजरे
प पू गगनगिरी महाराज विद्यालयात तहसीलदार मांजरे यांच्या उपस्थितीत ई पीक कार्यशाळा संपन्न
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये महाराष्ट्राच्या महसूल विभाग व कृषी विभागाच्या वतीने ई पीक पाहणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांच्या मदतीने शेतकऱ्यांना पीक पाहणी ऑनलाईन करता येईल अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. संगमनेरचे तहसीलदार माननीय धीरज मांजरे साहेब यांनी विद्यार्थ्यांना ई पीक पाहणी नोंदी संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. यासंदर्भातील नोंदी कशा घ्याव्यात याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. विद्यार्थ्यांशी खेळीमेळीच्या वातावरणात मांजरे साहेबांनी संवाद साधला. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान दहा शेतकऱ्यांना ई पीक पाहणीसाठी मदत करावी, त्यांची ई पिक पाहणी करून घ्यावी, नोंदी कराव्यात असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी देखील या आवाहनास उस्फुर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शैक्षणिक संकुलाचे संस्थापक, संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय बापूसाहेब देशमुख होते. कार्यक्रमास स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष श्री विलास साळवे सर तसेच पिंपरणे गावचे कामगार तलाठी संग्राम देशमुख साहेब उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात बापूसाहेब देशमुख यांनी मा. धीरज मांजरे साहेब यांच्या कार्याची प्रशंसा केली. दुष्काळी परिस्थितीमध्ये योग्य मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ई पीक पाहणी महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. अटल भूजल योजनेअंतर्गत झालेल्या वक्तृत्व स्पर्धांचे पारितोषिक वितरणही माननीय तहसीलदार धीरज मांजरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये नववी दहावीच्या गटात प्रथम श्रावणी दीपक कोटकर, द्वितीय सिद्धी सुनील देशमुख, तृतीय हर्षदा जय पारधे या विद्यार्थिनींनी पारितोषिक मिळवली. तर इयत्ता अकरावी बारावीच्या गटात प्रथम काजल गुलाब बागुल, द्वितीय ईश्वरी राजेंद्र चौधरी व तृतीय भूमिका जितेंद्र माळी या विद्यार्थिनींनी पारितोषिक मिळवली. या विद्यार्थिनींना श्री ललित शेळके सर व श्री विश्राम घाणे सर यांनी मार्गदर्शन केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मुकुंद डांगे यांनी केले. अध्यक्ष सूचना श्री डी आर सोनवणे सर यांनी मांडली. श्री बी.आर वाळे सर यांनी अनुमोदन दिले. कार्यक्रमाचे आभार श्री दिलीप डोंगरे यांनी मानले.
