
काका स्लिपवर नोटांचे नंबर टाकून देतो’ म्हणत ५८ हजार केले लंपास
पिंपरणेच्या शेतकऱ्याची फसवणूक; आयडीबीआयच्या संगमनेर शाखेतील घटना
संगमनेर / लोकवेध live न्यूज
काका तुमच्या चलन स्लिपवर नोटांचे नंबर टाकून देतो’ असे म्हणत अज्ञात तरुणाने ५३ वर्षीय शेतकऱ्याने बँकेत भरण्यासाठी आणलेल्या रुपयांतून ५८ हजार रुपये लांबविले. ही घटना मंगळवारी (दि.१०) दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास संगमनेर शहरातील जाणता राजा मैदान येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेत घडली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दत्तू लहानभाऊ गुंजाळ (वय ५३,व्यवसाय शेती, रा. पिंपरणे, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. आयडीबीआय बँकेची जाणता राजा मैदान येथे शाखा आहे. तेथे गुंजाळ हे रुपये भरण्यासाठी गेले होते. ते लाइनमध्ये उभें असताना त्यांच्याजवळ आलेला अज्ञात तरुण
त्यांना ‘काका तुमच्या चलन स्लिपवर नोटांचे नंबर टाकून देतो’ असे म्हणाला. त्याने गुंजाळ यांना बाजूला घेतले, त्यांच्या हातातील पैशांचे बंडल घेऊन स्लिपवर नोटांचे नंबर टाकत असताना पैशांचे बंडल खालीवर केले. गुंजाळ यांची नजर चुकवून त्याने ५०० रुपये किमतीच्या ११६ नोटा असे एकूण ५८ हजार रुपये लांबविले. बँक खात्यात रुपये भरत असताना त्यात ५८ हजार रुपये कमी असल्याचे गुंजाळ यांच्या लक्षात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला.

