आनंददायी शिक्षणासाठी कलात्मक उपक्रम गरजेचे- संजय पठाडे

संगमनेर तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
विद्यार्थ्यांना आनंददायी सर्वांगीण शिक्षण देण्यासाठी कलात्मक उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष गझलकार संजय पठाडे यांनी केले. ते संगमनेर येथील तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते.
 अहमदनगर जिल्हा कलाशिक्षक संघाच्या संगमनेर शाखेतर्फे नुकत्याच तालुकास्तरीय रंगभरण स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात तालुक्यातील विविध शाळांमधील साडेअकरा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण नुकतेच संगमनेर येथील दि. ग. सराफ विद्यालयात झालेल्या समारंभात पार पडले. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक नाट्य कलावंत द्वारकानाथ जाधव हे होते. प्रमुख अतिथी म्हणून अहमदनगर जिल्हा कलाशिक्षक संघाचे अध्यक्ष गझलकार संजय पठाडे उपस्थित होते.
 यावेळी बोलताना पठाडे म्हणाले, विद्यार्थ्यांना आनंददायी सर्वांगीण शिक्षण देण्यासाठी विविध कलात्मक संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे, पण आनंदी जीवन जगण्यासाठी जीवनात कलेची साधना करावी. कलेमध्ये जीवन परिवर्तनाची ताकद असते असेही त्यांनी सांगीतले. चित्रकार महादेव गोपाळे यांनी आपल्या कला प्रवासातील अनुभव कथन केले. यावेळी स्पर्धेचे परीक्षक अकोले तालुका अध्यक्ष मिनीनाथ खराटे, कार्याध्यक्ष मिनीनाथ जोर्वेकर आणि द्वारकानाथ जाधव यांची भाषणे झाली. संगमनेर तालुकाध्यक्ष संतोष गोरे यांनी प्रास्ताविक केले. सेवानिवृत्त होत असलेले कलाशिक्षक विजयकुमार थिटे यांना यावेळी मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा सचिव रविंद्र गायकवाड, उपाध्यक्ष संदीप कानवडे, पारनेर तालुकाध्यक्ष कानिफनाथ गायकवाड, साहेबराव घुले, संगमनेर तालुका सचिव दत्तात्रय बटवाल, खजिनदार भागवत रावताळे, सहसचिव विजय पवार, विविध पदाधिकारी यांच्यासह पारितोषिक प्राप्त विद्यार्थी, पालक व कलाशिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.
 यावेळी तालुका स्तरावरील पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह, प्रशस्तिपत्र आणि रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. विविध गटातील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणेः शहरी विभाग- कु. अनन्या भाऊसाहेब शिंदे (गट पहिला), आर्यन संदीप सालके (गट दुसरा), कु. भावना संतोष काकडे (गट तिसरा), कार्तिक दत्तात्रय बटवाल (गट चौथा) आणि तनिष्क संतोष दिवे (गट पाचवा). ग्रामीण विभागात कु. प्रभा दीपक क्षीरसागर (गट पहिला), विघ्नेशाराजे किशोर आहेर (गट दुसरा), कु. गौरी संतोष खैरे (तिसरा), कु. अनुष्का राजेश पठारे (गट चौथा), कु. सिद्धी सुनिल देशमुख (गट पाचवा).
 प्रारंभी सराफ विद्यालयाच्या मुलींनी स्वागतगीत सादर केले. स्वाती कासार व मीना कुरापाटी यांनी सूत्रसंचालन केले तर भास्कर पारासूर यांनी आभार मानले. पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!