पोदार इंटरनॅशनल विद्यालय ओझर येथे नवरात्री उत्सवानिमित्त ‘दांडिया नाईट’ चे आयोजन यशस्वी संपन्न
नाशिक / लोकवेध live न्युज
यादेवी सर्वेभूतंषू मातृरूपेण संस्थितः
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
सर्वमंगल मांगल्ये शिवेसर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।।
नवरात्र हा सण फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. नवरात्र देवीच्या उपासनेचा उत्सव म्हणून ओळखला जातो. नवरात्रीत दुर्गा देवी आणि राक्षस राजा महिषासुर यांच्यात नऊ दिवस चाललेल्या युद्धाचे वर्णन देखील करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये देवी माता विजयी होते. वाईटा प्रती चांगल्याचा विजय होतो .या उत्सवात गरबा आणि दांडिया या प्रसिद्ध नृत्यांचे आकर्षण लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना असते. गरबा आणि दांडिया या दोन्ही नृत्यांची निर्मिती गुजरातमध्ये झाली आहे. त्याचबरोबर हे दोन नृत्य उत्सवासाठी भक्ती आणि मर्यादा दर्शवितात. नवरात्री हा उत्सव देवीची भक्ती करण्याबरोबरच आनंद साजरा करण्याचा ही काळ आहे. म्हणूनच या उत्सवाच्या निमित्ताने पोदार इंटरनॅशनल स्कूल ओझर या विद्यालयात ‘दांडिया नाईटचे’ आयोजन करण्यात आले होते. या उत्सवाची सुरुवात विद्यालाच्या प्राचार्या जसिंथा पारके, श्रावणी कामुजू, विशाल मेंढे आणि पालकवर्ग यांच्या हस्ते देवीच्या आराधनेने करण्यात आली. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली. या उत्सवासाठी विद्यालयातील विद्यार्थी आणि पालक वर्ग यांचा उस्फूर्त सहभाग लाभला. विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी, इतर कर्मचारी वर्ग, पालक वर्ग सर्वांनी दांडिया नृत्याचा परिवेश परिधान करुन, बेभान होऊन दांडिया आणि गरबा नृत्याचे उत्कृषटरित्या सादरीकरण केले होते. विद्यालयाचे संपूर्ण वातावरण नृत्यमय झाले. त्यानंतर विद्यालयातर्फे पालक आणि विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले होते. त्यामध्ये सर्वोत्तम जोडपे नृत्य श्री . दक्षेश व सौ. भूमी डोडीया, सर्वोत्तम पुरुष पोशाख श्री . सौरभ कुमार चोरडिया, सर्वोत्तम महिला पोशाख सौ . रुपाली टर्ले आणि सौ. पूनम रावत, सर्वोत्तम पोशाख इश्म देशमुख, आर्यन जोंधळे, रिद्धी अहिरे, अर्पिता चौहान सर्वोत्तम नर्तक भार्गव साळुंके व विवान शिलिमकर आणि सर्वोत्तम नर्तकी श्वेता गोडले व अन्विषा गोस्वामी. त्याचबरोबर विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी आणि पालक वर्गाच्या उत्कृष्ट सादरीकरणाने आणि उत्साही प्रतिसादाने विद्यालयाचे प्रांगण आनंदमय झाले होते. ‘दांडिया नाईटची’ उत्तम संकल्पना विद्यालयाच्या प्राचार्या जसिंथा पारके यांच्या मार्गदर्शनाने पूर्णत्वास आली.
