संगमनेर /लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशुधन असून तालुक्यातून दररोज सुमारे सात लाख लिटर दूध निर्माण होत आहे या पशुधनासाठी मुरघास हा अत्यंत उपयोगी ठरला असून अत्याधुनिक पद्धतीने कसदार व दर्जेदार मुरघास बनवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांनी केले आहे.
यावेळी बोलताना रणजितसिंह देशमुख म्हणाले की, विधिमंडळ पक्षनेते आ.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्याच्या ग्रामीण विकासात दूध व्यवसायाने मोठे योगदान दिले आहे. मुक्त संचार गोठा गाईंच्या आरोग्यासाठी विविध शिबिरे असे उपक्रम राबवले गेले असून मुरघासाचे तंत्र तालुक्यात अवलंबले गेल्याने दूध उत्पादन क्षेत्रात त्याचा मोठा लाभ झाला आहे. आज ग्रामीण भागातील प्रत्येक घरासमोर मुरघासाच्या पाच – दहा बॅगा उभ्या असतात. हा मुरघास जास्त दिवस टिकवा व कसदार राहावा याकरता नवीन पद्धतीचा अवलंब केला पाहिजे.पंजाब,हरियाणा व ब्राझील येथील शेतकऱ्यांनी मुरुघासामध्ये केलेल्या आधुनिक पद्धतीचा अभ्यास करून हे तंत्र आपल्याकडील शेतकऱ्यांना वापरता यावे यासाठी शेतकऱ्यांचे गट तयार करून त्यांना प्रशिक्षण देण्याचा चांगला निर्णय राजहंस दूध संघाने घेतला आहे. या माध्यमातून हे उत्पादक अधिकाधिक मुरघास तयार करून इतरांनाही मार्गदर्शन करतील आणि त्यातून पशुधन आरोग्यसह दूध निर्मिती वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तर डॉ.संतोष वाकचौरे म्हणाले की, मक्यापासून मुरघास बनवताना मका कोणत्या स्थितीत असावी. मुरघास करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी. तो खराब होऊ नये म्हणून कोणत्या कल्चरचा वापर करावा, मुरघास निर्मिती कमी खड्डा पद्धत दोन ते पाच मीटर क्षमतेच्या मुरघास बॅगा व एक मेट्रिक टन क्षमतेच्या मुरघास बॅगांचे कशा पद्धतीने भरणा करावी याबाबतची तंत्र त्यांनी सांगितले.
यावेळी विविध शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी हा उपक्रम आपल्या गावात राबवून अनेकांना सहभागी करून घेतले जाईल असे सांगताना हा पॅटर्न राज्यासाठी दिशादर्शक ठरेल असेही म्हटले आहे.

