जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पेटीट विद्यालयात विद्यार्थ्यांचा सत्कार
संगमनेर / लोकवेध live न्यूज
शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीचे सर डी एम पेटीट विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य सी एन निकम यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमा साठी प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हेवाडी येथील श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्रीकांत माघाडे तर अध्यक्षस्थानी इन्चार्ज प्रा. गुलाब गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने करण्यात आली. प्रारंभी दिव्यांग विद्यार्थी व प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सरस्वतीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सातपुते ऋषिकेश (११ कला), खताळ शिवप्रसाद (१२ विज्ञान), विजय झारेसोनार, पियुष वैराळ (११ वाणिज्य) या दिव्यांग विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे प्राचार्य श्रीकांत माघाडे बोलताना म्हणाले की, दिव्यांग विद्यार्थी अत्यंत कष्टाळू व प्रामाणिक असतात. त्यांच्या जीवनात जे दुःख आलेले आहे ते समाजाने समजून घेऊन त्यांची हेटाळणी करू नये किंवा त्यांना दुःख देऊ नये. समाजात त्यांनाही सर्वांनी मान – प्रतिष्ठा द्यावी. दिव्यांग विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास करून जीवनात मोठे व्हावे असे आवाहन केले. अध्यक्ष भाषणात प्रा. गायकवाड सर म्हणाले की, दिव्यांग व्यक्तींजवळ मूळतःच दिव्यशक्ती असते. आपल्या दिव्यशक्तीच्या जोरावर ते कठीण परिस्थितीशी सामना करत असतात. दिव्यांग व्यक्तींना सर्वांनी नेहमी मदत करून त्यांचा आदर करावा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. दशरथ गभले यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकांक्षा जमधडे व अंजली हरनामे या विद्यार्थिनींनी केले. प्रा. रूपाली देशमुख यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी प्रा. परेश सांगवीकर, प्रा. स्वप्निल शिंदे, प्रा. भाऊसाहेब मांढरे, प्रा. अमोल टेमक, प्रा. सुनीता शिंदे, प्रा. सिमिका मिश्रा, प्रा. सुशीला चिमणकर, प्रा. उषा जाधव, श्रीमती मनीषा खाटेकर आदींसह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
