चांदोरीकरांचा सारथी किसन मामा बस्ते

नाशिक / लोकवेध live न्यूज / निलेश शेकोकार 

चांदोरी ग्रामपालिकेत कार्यरत कर्मचारी श्री किसन बस्ते मामा यांचे शनिवारी अचानक दुःखद निधन झाले.एक अत्यंत मेहनती प्रामाणिक व कष्टाळू,उत्साही,सतत हसतमुख सहकारी अशी त्यांची ओळख. ग्रामपालिकेच्या सर्व विभागाच्या कामांची जबाबदारी अत्यंत समर्थपणे पार पाडण्याची ताकद मामांमध्ये होती.कोणीही कोणतेही काम सांगितले तरी ते होणारच,मामा कधीच नाही म्हणाले नाही.नाही हा शब्द त्यांचे डिक्शनरी मध्येच नव्हता असे म्हणावे लागेल.
ग्रामपालिकेच्या सेवेत असतांना व साधारणपणे १९९५ सालापासून गावातील प्रत्येक सार्वजनिक विकास कामात मामांचा सहभाग असे.प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रम,मंदिर बांधकाम,सप्ताह,वर्गणी जमा करण्यापासून समाप्ती पर्यंत, स्वच्छता असो किंवा शासकीय योजनांची कोणतेही काम,बांधकाम व मामांचा ट्रॅक्टर हजरच राहणार. सकाळी ७ वाजेच्या अगोदर मामा बांधकामावर पाणी मारून तयार असत. कोणतेही सार्वजनिक काम हे स्वतःचे घरचे काम समजून करत, कोणीही आवाज द्यावा मामा हजर असं व्यक्तिमत्व.मामा नेहमी सांगत, या लोकांचे माझेवर खूप प्रेम व विश्वास आहे त्यामुळे मी नाही म्हणू शकत नाही.परमेश्वराने खरंच त्यांना एवढे सामर्थ्य दिले होते की मामा कोणत्याही कामाला नाही म्हणत नसत मग ते वैयक्तिक असो कि सार्वजनिक असो.
मामांचे मूळ काम घंटागाडी, ग्रामपालिकेने २००५ साली पहिला ट्रॅक्टर खरेदी केला अन मामाचे कचरा जमा करण्याचे काम सुरु झाले.कचरा म्हणजे कुटुंबातील महिला वर्गाशी संबंधित काम, त्यामुळे मामाचा प्रत्येक घरातील माय -माऊली सोबत बहीण भावाचे नाते सुरु झाले.घंटागाडी आली म्हणजे बस्ते मामा आले हे समीकरणच चांदोरी करांच्या साठी तयार झालेत. जसजशी गावाची प्रगती होत गेली तसे गावात शाळा,कॉलेज,हॉटेल,धाबे मंगलकार्यलय आले.मामाचा कामाचा पसारा वाढला व घंटागाडीची तिकडेही मागणी झाली.
गावातील अंत्यविधी सोयीसाठी मग वैकुंठ रथ आला,पुढे पर्यायाने मामाकडेच जबाबदारी आली,हजारो जणांचा शेवटचा वैकुंठाचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून *वैकुंठरथाचे सारथ्य* करून मामांनी रात्री अपरात्री खांदा दिला.मग सर्वच सोपस्कार मामा पार पाडीत.कुठलाही वेळ असो स्वतःचे कुटुंब सोडून रात्री अपरात्री सेवा देण्यासाठी मामा हजर. कोरोना काळ खरा कसोटीचा राहिला,कुटुंबातील सदस्य ही अंत्यविधी साठी नसतांना अनेकांना वैकुंठधाम मध्ये मामांनी स्वतःच खांदा दिला व कुटुंबातील सदस्याप्रमाणे शेवटची सेवा केली.
प्रत्येक कुटुंबाशी मामांचे प्रेमाचे व जिव्हाळ्याचे संबंध अनेक जेष्ठाबरोबर काम करण्याची संधी मामांनी लाभली.वेगवेगळ्या जाती धर्माचे राजकीय पक्षाचे लोकांशी मामांचे जवळून संबंध आले,पण त्यांनी कधीही या कानाची गोष्ट त्या कानी होऊ दिली नाही.त्यामुळेच त्यांचे प्रत्येकशी संबंध तयार झाले. पदाधिकारी अधिकारी कोणीही बदलो पण त्याच उमेदीने,विश्वासाने, उत्साही पणाने मामांनी शेवट पर्यंत ग्रामपालिकेचे काम केले.आपला परका असा भेदभाव कधीच केला नाही.कोणतेही काम पूर्ण झाल्याशिवाय शांत बसायचे नाही हा त्यांचा स्वभाव.वडील म्हणून कुटुंबाची ही जबाबदारी अत्यंत समर्थपणे पार पाडून मुलांना नोकरी मिळविली.मुलांचे व मुलीचे लग्न स्वतः कष्ट करून पार पाडले.
खरं तर ही वेळ जाण्याची नक्कीच नव्हती,अजून बराच टप्पा पार करावयाचा होता पण नियतीपुढे व परमेश्वरापुढे कोणाचे काही चालत नाही.आपण आचानक आमच्या बरोबरचा प्रवास अर्धवट सोडून गेलात.आम्ही अजूनही आपण गावावरून येणार म्हणून वाट पाहत आहोत,कोणत्या तरी रूपाने आपण नक्कीच या.आपल्याला अजूनही बरेच काम करायचे आहे.आपण जीवापाड प्रेम केलेले ती निर्जीव वास्तू घंटागाडी,वैकुंठरथ,पाणी टँकर,स्मशानभूमीतील पाणी टाकीचा कॉक सजीव असल्यासारखी आपली वाट पाहत आहेत.अजूनही महिला भगिनी घंटागाडीची नाही तर बस्ते मामाची वाटा कडे नजर लावून वाट पाहत आहेत.मामांनी कायमची सुट्टी घेतली आहे हे त्यांना कोण पटवून देणार???
आपले निष्काम व चांगले कर्म निश्चितच आपल्या पुढील प्रवासात आपल्याला साथ देईल व आपण आयुष्यभर निःस्वार्थ पणाने सेवा केलेल्या लोकांची दुवा आपल्या मागे राहीलच.आपल्याला वैकुंठात निश्चितच चांगली जागा मिळेल हीच परमेश्वराकडे प्रार्थना

बस्ते मामांच्या कार्याची दखल व आठवण म्हणून ग्रामपालिकेच्या वैकुंठरथाला कार्यतत्पर कर्मचारी श्री कै.किसन बस्ते मामा स्मृती वैकुंठ रथ असे नामकरण करण्यात येत आहे

श्री सुरेश भांबारे
ग्रामविकास अधिकारी
ग्रामपालिका चांदोरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!