डॉ. राजेंद्र विखे पाटील यांचा कृतज्ञता सत्कार
संगमनेर /लोकवेध live न्यूज
अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या व गोरगरिबांसाठी आधारवड असलेल्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन पूर्णतः बरे झालेल्या सुरेखा कवडे (देशमुख) यांच्या वतीने प्रवरा ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ.राजेंद्र विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या की, मला गत अनेक वर्षांपासून दम लागणे ,छातीत दुखणे ,चालताना चक्कर येणे अशी लक्षणे होती प्रवरा हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वी अनेक ठिकाणी उपचार घेतले परंतु मला असलेल्या आजाराचे अचूक निदान होत नव्हते. शेवटी काही नातेवाईकांनी मला प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे उपचार घेण्याचा सल्ला दिला. डॉ. सुनील दिघे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी मला तपासणी केली व हृदयाची झडप बदलण्याचा सल्ला दिला यावेळी मी पूर्ण घाबरली होती परंतु डॉ.दिघे यांनी माझ्या मनातील भीती दूर करून योग्य ते मार्गदर्शन केले व मला ऑपरेशन साठी पूर्ण तयार केले. मी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात ऑपरेशन साठी ऍडमिट झाले दिल्ली येथून येणारे प्रसिद्ध कार्डियाक सर्जन डॉ.राहुल चंडेला व त्यांच्या टीमने माझ्या हृदयाची झडप बदलून ऑपरेशन यशस्वी केले.
याप्रसंगी, सौ.कवडे यांचा मुलगा चेतन यांनी सांगितले की , माझ्या आईचा ऑपरेशन नंतर पुनर्जन्म झाला आहे ऑपरेशन पूर्वी कसे करावे ,कुठे करावे काय करावे ही काही सुचत नव्हते परंतु प्रवरा हॉस्पिटलला आल्यानंतर कुठलीही अडचण आली नाही व ऑपरेशनही यशस्वीरित्या पार पडले हे सर्व शक्य झाले ते फक्त डॉ.राजेंद्र विखे पाटील यांच्यामुळेच… दिल्लीला जाऊन ऑपरेशन करणे इतके सोपे नव्हते खर्चही मोठा होता परंतु प्रवरा हॉस्पिटल लोणी येथे पूर्णतः मोफत झाले मी प्रवरा हॉस्पिटल हे गोरगरिबांसाठी वरदान आहे असे ऐकून होतो पण मी स्वतः अनुभवले. मला तर डॉ राजेंद्र विखे पाटील यांच्यात साक्षात विठ्ठलचं दिसले.
याप्रसंगी , डॉ.राजेंद्र विखे पाटील म्हणाले की हृदयरोग शस्त्रक्रियेसाठी दिल्लीहुन अगदी भुलतज्ञांसह संपूर्ण टीम येथे कार्यरत आहे यासाठी लागणारा खर्च खूप मोठा आहे पण लागणाऱ्या खर्चाकडे विशेष लक्ष न देता गरीब व सामान्य माणूस केंद्र मानून मानव धर्म हा एकमेव धर्म आहे या उद्देशाने हे मोठे कार्य आम्ही सुरू केले आहे हृदय शस्त्रक्रियेबरोबरच ,एन्जोप्लास्टी , गुडघ्यांचे सांधेरोपण , मेंदूच्या शस्त्रक्रिया , पोटाचे लहान-मोठे ऑपरेशन तसेच इतर सर्व प्रकारचे शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत करण्यात येतात आपल्याकडे अद्यावत आय.सी.यु सुविधा उपलब्ध आहे .याचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले .यावेळी कवडे कुटुंबियांनी डॉ.राजेंद्र विखे पाटील ,ध्रुव विखे पाटील , प्रसिद्ध कार्डियाक सर्जन डॉ. राहुल चंडेला ,डॉ.रविंद्र मनेरीकर, डॉ. धीरज, डॉ. सुमेश रेड्डी व रुग्णालयाचे कर्मचारी यांचे आभार मानले.
