टाकळी केंद्र शिक्षक परिवाराकडून डॉ.श्रीनिवास पोतदार यांचा गौरव गटशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान

अकोले / लोकवेध live न्यूज 

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका बीट देवठाण मधील जिल्हा परिषद टाकळी केंद्रशाळेचे मुख्याध्यापक व उपक्रमशील पदवीधर शिक्षक डॉ.श्रीनिवास विजय पोतदार यांना नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत इतिहास विषयात मानद पीएच.डी.अर्थात विद्यावाचस्पती डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी हे यश मिळविले.‌ त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे अकोले तालुका शिक्षण विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. डॉ.‌ पोतदार यांच्या या सुयशाचे औचित्य साधून देवठाण बीटाचे सन्माननीय शिक्षण विस्तार अधिकारी श्री. अनिल गायकवाड व टाकळी केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती रोहिणी खतोडे यांच्या संकल्पनेतून अकोले तालुका पंचायत समितीचे माननीय गटशिक्षणाधिकारी श्री. अभयकुमार वाव्हळ यांच्या शुभहस्ते टाकळी केंद्रातील शिक्षक परिवाराकडून जिल्हा परिषद शाळा गर्दणी येथे शिक्षक दिनानिमित्त संपन्न झालेल्या गुणगौरव सोहळ्यात डॉ.श्रीनिवास पोतदार यांचा आदर्श उच्चविद्याविभूषित शिक्षक म्हणून सन्मानपत्र देवून सपत्नीक सत्कार करण्यात आला. या प्रसंगी श्रीमती सविता कचरे मा. शिक्षण विस्तार अधिकारी बीट राजूर तसेच टाकळी केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.‌ कार्यक्रमादरम्यान डॉ.पोतदार यांच्या यशाबद्दल व‌ त्यांनी विविध शाळांमधून केलेल्या उल्लेखनीय गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याबद्दल विस्तार अधिकारी श्री.‌अनिल गायकवाड, श्रीमती सविता कचरे, केंद्रप्रमुख श्रीमती रोहिणी खतोडे, गर्दणी शाळेचे मुख्याध्यापक श्री.‌सोमनाथ घोरपडे, ज्येष्ठ पदवीधर शिक्षक श्री.‌बबन गाडेकर, श्री. दत्तात्रय देवगिरे, उपक्रमशील शिक्षिका श्रीमती सुनिता वल्टे, उंचखडक खुर्द शाळेचे मुख्याध्यापक श्री.‌डी.डी. वाकचौरे, टाकळी शाळेचे ज्येष्ठ उपाध्यापक श्री.‌संजय शिंदे, डॉ.‌ श्रीनिवास पोतदार यांच्या सुविद्य पत्नी सौ.‌वंदना पोतदार, कन्या कु. शरयू पोतदार यांची गौरवपर भाषणे झाली.‌ सत्कारमूर्ती डॉ.श्रीनिवास पोतदार यांना देण्यात आलेल्या सन्मानपत्राचे वाचन श्रीमती सुनिता वल्टे यांनी केले.‌ गुणगौरव सोहळ्याचे प्रमुख अतिथी व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.‌गटशिक्षणाधिकारी श्री.अभयकुमार वाव्हळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रीनिवास पोतदार यांनी मिळविलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक केले. तसेच त्यांच्या शेंडी बीटातील उत्कृष्ट शैक्षणिक कार्याचा आवर्जून उल्लेख केला.‌ टाकळी केंद्र शिक्षक परिवाराच्या स्तुत्य उपक्रमाची देखील त्यांनी विशेष प्रशंसा केली. टाकळी केंद्र शिक्षक परिवाराकडून आयोजित गुणगौरव सोहळ्यातील दिमाखदार सत्काराला उत्तर देताना डॉ. श्रीनिवास पोतदार यांनी आयोजन समितीचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले. तसेच आपल्या मनोगतातून ब्रिटिशकालीन नाशिक जिल्ह्याचे प्रशासन या पीएच.डी. संशोधन विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी सादर केली. याशिवाय बावीस वर्षांच्या शैक्षणिक प्रवासाला उजाळा दिला. हरसूल तालुका त्रिंबकेश्वर जिल्हा नाशिक येथील मुळ रहिवासी असलेले श्रीनिवास पोतदार यांनी फेब्रुवारी २००२ मध्ये डी.एड. पात्रतेवर शिक्षण सेवक म्हणून नोकरी मिळवली. मात्र एका बाजूने आपले बहिस्थ शिक्षण सुरूच ठेवले. विद्यार्थी गुणवत्तेचा व ज्ञान साधनेचा ध्यास मनाशी बाळगून शिक्षण विभागाच्या परवानगीने त्यांनी विशेष नैपुण्यासह बी.ए.,एम.ए. बी.एड. डि.एस‌.एम. एम.एड. एम.फिल. व सेट, नेट हे शिक्षणक्रम दुर्दम्य इच्छाशक्ती व चिकाटी बाळगून यशस्वीरीत्या पूर्ण केले. दरम्यानच्या काळात प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करीत असताना अकोले तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी पेसा क्षेत्रात बाभुळवंडी, जहागिरदारवाडी बारी, वारंघुशी, शेंडी, भंडारदरा येथे उत्कृष्टरित्या ज्ञानदानाचे कार्य केले. अकोले तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण दूरगामी विकासासाठी सातत्याने नवनवीन उपक्रम राबविले. डॉ. पोतदार यांच्यातील ज्ञानलालसा व विद्वत्तेची पारख करून त्यांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था डाएट संगमनेर येथे दोन वर्षे सामाजिक शास्त्र जिल्हा विषय तज्ञ तसेच राज्य व विभागीय पातळीवर काम करण्याची शिक्षण विभागाकडून संधी देण्यात आली. सध्या ते अकोले तालुक्यातील देवठाण बीटातील टाकळी शाळेत विद्यार्थी गुणवत्तेचा ध्यास घेवून शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व टाकळी ग्रामस्थांच्या सहकार्यातून नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवीत आहेत. डॉ.‌ पोतदार यांनी आपल्या भाषणात पीएच.डी. संशोधनासाठी मदत करणा-या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले. प्रस्तुत गुणगौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन गर्दनी शाळेचे ज्येष्ठ पदवीधर शिक्षक मा. बबन गाडेकर यांनी केले. श्री.विजय धुमाळ, वसुंधरा फोटो अकोले यांनी छायाचित्रण केले.‌

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!