शेतकऱ्याचा नाद नाही करायचा !
तब्बल अडीच लाख रुपये देत खरेदी केली शेतकऱ्याने ‘डेन्मार्क’ जातीची सोनू, असे आहेत या गाईचे वैशिष्ट्ये
लोकवेध live न्यूज
समाजामध्ये आपण बऱ्याचदा पाहतो की बरेच असे शेतकरी आहेत की त्यांना अनेक प्रकारच्या पशुपालनाची हौस असते व त्यासाठी ते कोणत्याही प्रकारची किंमत मोजायला तयार असतात. अनेकदा आपण माध्यमांमधून बातम्या वाचत असतो की, लाखो रुपये किमतीमध्ये रेडा किंवा शर्यतीचे बैल विकत घेतले जातात.कधी पैशाला महत्त्व न दिले जाता हौसेला मोल असते व अशा परिस्थितीतून अशा मोठ्या किमतींना खरेदी किंवा विक्री केली जाते. आपण बऱ्याचदा बैलांना मिळणाऱ्या किमतीच्या बाबतीत वाचले किंवा ऐकले असेल. परंतु एखाद्या गाईला लाखात किंमत देत तिची खरेदी करणे हे खूप कमी प्रमाणात ऐकायला किंवा वाचायला येते. परंतु एका शेतकऱ्याने तब्बल अडीच लाख रुपये देत डेन्मार्क जातीच्या गाईचे खरेदी केली आहे.
मंचर येथील शेतकऱ्याने खरेदी केली अडीच लाख रुपये देत सोनू नावाची डेन्मार्क जातीची गाय.
मंचर येथील शेतकरी गणेश खानदेशे यांनी डेन्मार्क जातीची सोनू नावाची एक गाय तब्बल दोन लाख 51 हजार रुपयांना विकत घेतली असून सध्या सोशल मीडियावर या गाईची खूप चर्चा सुरू आहे. गणेश अनंत खानदेशे यांनी सोलापूर येथील शेतकरी संजय पाटील यांच्याकडून डेन्मार्क जातीची जास्त दूध देणारी गाय तब्बल अडीच लाख रुपयांना खरेदी केली असून या गाईचे नाव सोनू असे आहे.
यापूर्वी विचार केला तर खानदेशी यांनी त्यांची एक गाय तब्बल एक लाख एकतीस हजार रुपयांना विकली होती व त्याचीही चर्चा बरीच झाली होती. सोनू गाय घेतल्यानंतर खानदेशी यांच्या घरी गाईच्या आगमन झाल्यानंतर त्याचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. या गाईला राहण्यासाठी सुसज्ज असा गोठा तयार करण्यात आला असून यामध्ये 24 तास पाण्याची व चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गोठ्याचे निर्मिती करताना ती मुक्त संचार पद्धतीची करण्यात आली असून या गाईला फिरण्यासाठी खूप मोठी जागा ठेवण्यात आली आहे. एवढेच नाही तर तिचे व्यवस्थापन करताना विशेष काळजी देखील घेतली जाणार आहे.
डेन्मार्क जातींच्या गाईंचे वैशिष्ट्ये
या जातीच्या गाय अतिशय शांत व सर्वगुणसंपन्न असतात. अतिशय शांत स्वभाव तसेच जास्त दूध देणाऱ्या जातीवंत गाई असतात. सोनू गाईचा विचार केला तर ती साडेचार वर्षाची असून तिचे वजन नऊ क्विंटल आहे व उंची सहा तर लांबी जवळपास आठ फूट आहे. या गाईचा शरीराचा पुढील भाग लहान व मागील भाग मोठा तसेच कान व डोळे, डोके लहान, गुडघ्याच्या वर कासेची ठेवण, सडात योग्य अंतर, रंगाने काळी आणि पायाचा मागील भाग सरळ असा आहे. डेन्मार्क जातीच्या सोनू गाईचे वैशिष्ट्य म्हणजे या गाईचे दूध देण्याची क्षमता प्रत्येक दिवसाला 40 ते 42 लिटर इतकी आहे.
