भंडारदरा शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात साजरा
भंडारदरा (अकोले) / लोकवेध live न्यूज
शेंडी बीटातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भंडारदरा येथे विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाचा व वार्षिक स्नेहसंमेलाचा सांस्कृतिक सोहळा नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भंडारदरा गावच्या सरपंच अनिता खाडे होत्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कातळापुर केंद्राचे केंद्रप्रमुख रामदास लांघी व नाशिक येथील स्वप्नपूर्ती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सचिन काकडे, सदस्य कार्तिकेश बोरसे व अथर्व पाटील उपस्थित होते. या दिमाखदार सोहळ्यात विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक, आदिम, सामाजिक, देशभक्तीपर व प्रबोधनात्मक विषयांवर विविध कार्यकामांचे नेत्रदिपक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते. यावेळी स्वप्नपूर्ती संस्थेकडून सर्व विद्यार्थ्यांना लेखन साहित्य व वह्यांचे वाटप करण्यात आले. या निमित्ताने भंडारदरा शाळेचे माजी मुख्याध्यापक डॉ. श्रीनिवास पोतदार यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल संयोजन समितीकडून विशेष नागरी सत्काराने सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापनचे पांडुरंग खाडे, गंगाराम इदे, दिनकर खाडे, बुळे साहेब तसेच मुख्याध्यापक धोंडू मुंढे, सहाय्यक शिक्षक भाऊ गंभीरे, भाऊसाहेब भांगरे व लता भागडे यांनी विशेष परिश्रम घेतले. या आनंदमयी सोहळ्याचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद टाकळी शाळेचे मुख्याध्यापक डॉ. श्रीनिवास पोतदार यांनी केले. भंडारदरा शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सदोदित वाव देत असल्याबद्दल अकोले पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांनी शाळेच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले आहे.
