चंदनापुरी गावात सर्व जाती,धर्मीयांच्या अंत्यविधीसाठी मोफत सरपणाची व्यवस्था
चंदनापुरी येथील मुळगंगा पतसंस्थेचा समाजहितार्थ पुढाकार
मानवाच्या मृत्यूनंतर अंतिम संस्काराच्या प्रक्रियेत लागणाऱ्या अत्यावश्यक बाबींपैकी एक विशेष बाब म्हणजे सरपण सरपणाचा प्रश्न चंदनापुरी येथील एका संस्थेने ग्रामस्थांसाठी कायमस्वरूपी सोडविला आहे. अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी येणाऱ्या सर्व जाती-धर्मातील नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील मुळगंगा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने १ जूनपासून अमरधामात होणाऱ्या सर्व अंत्यविधीसाठी मोफत सरपण उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा सातत्याने सुरू राहणार आहे.
अंत्यविधीच्या वेळी कुटुंबावर मानसिक दुःखासोबत आर्थिक भारही येतो. त्यात सरपणासाठी खर्च हा विशेषतः ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जाणवतो. ही गरज ओळखून मुळगंगा पतसंस्थेने या सामाजिक उपक्रमाची सुरुवात केली आहे. यामुळे मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना दिलासा मिळणार असून, ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल समाधानाची भावना व्यक्त होत आहे. या उपक्रमामुळे चंदनापुरी अमरधाममध्ये येणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला आवश्यक तेवढे सरपण संस्था पुरविणार आहे. यासाठी आवश्यक नियोजन संस्थेने केले असून, सरपणाची साठवणूक आणि नियमित पुरवठा यासाठी विशेष व्यवस्था उभारण्यात
आली आहे.यासाठी अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी सर्व जाती-धर्मातील नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. येथे अंदाजे १० बाय १५ फूट आकाराचे शेड उभारण्यात आले. येथे लहान-मोठ्या एकूण दहा मण सरपण ठेवण्यात आले असून, अंत्यविधीच्या वेळी हे सरपण मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. हा निर्णय मुळगंगा पतसंस्थेचे संस्थापक आर. बी. राहणे, अध्यक्ष लहानूभाऊ राहाणे, उपाध्यक्ष कैलास सरोदे आणि सर्व संचालक मंडळातर्फे घेण्यात आला.
संस्थेच्या या निर्णयाचे गावातील सरपंच भाऊराव रहाणे नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे. दुखद प्रसंगी कुटुंबीयांच्या खांद्याला खांदा लावणारा हा उपक्रम इतर गावांसाठीही आदर्श ठरणारा आहे. संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्यांच्या पुढाकारातून सामाजिक बांधिलकीची ही जाणीव अधिक दृढ होत असून, भविष्यात अशा अनेक उपक्रमांची गरज असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.
