*शिक्षण क्षेत्राला दिशा देणारे पुस्तक : शाळा एके शाळा*

द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालय, बीड येथे कार्यरत असणारे सहशिक्षक श्री. माधव अरूणराव डाके लिखित ‘शाळा एके शाळा’ ही लघुकादंबरी. पुस्तकाच्या शिर्षकावरूनच हे पुस्तक शिक्षणक्षेत्राशी संबंधित असल्याचे लक्षात येते. माधव डाके हे स्वत: शिक्षक म्हणून एका शाळेत काम करत असल्याने शिक्षण संस्था, संस्थाचालकांचा शाळेच्या प्रगतीबद्दलचा दृष्टीकोन, मुख्याध्यापकाला संस्था व शिक्षक यामधील दुवा म्हणून काम करीत असताना प्रशासन चालवताना करावी लागणारी कसरत, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थ्यांचे मनोभाव यांचे त्यांनी जवळून निरीक्षण केलेले असल्याने ही कादंबरी लिहीताना त्यांनी शिक्षणक्षेत्राच्या वास्तविकतेशी सांगड घातली आहे.
पुस्तकास पत्रकार, साहित्यिक स्वर्गीय प्रा. एकनाथ आबुज यांची प्रस्तावना लाभलेली असून ह.भ.प. मोहन महाराज खरमाटे यांचा शुभेच्छा संदेश आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ आकर्षक आणि बोलके आहे. एक चांगला मुख्याध्यापक उत्तम शिक्षक असतोच असे नाही तसेच एक चांगला शिक्षक चांगला मुख्याध्यापक बनु शकतोच असे नाही असे म्हटले जाते. एक चांगला मुख्याध्यापक शाळेला केवळ एक इमारत नाही, तर एक समुदाय बनवतो, जिथे विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र शिकतात आणि वाढतात. एक चांगला मुख्याध्यापक हा शाळेला दिशा देणारा आणि एक मजबूत नेता असतो. माधव डाके यांनी अरूण भिडे या आदर्श शिक्षक व मुख्याध्यापकाचे व्यक्तीचित्र पुस्तकात रेखाटले आहे.
अरूण भिडे हे संस्थेतील एका शाळेवर उपमुख्याध्यापक पदावर कार्यरत असतात. कडक शिस्तीचे व हाडाचे शिक्षक म्हणून त्यांची ख्याती असते. संस्थेचीच संस्कार विद्यालय नावाची एक दुसरी माध्यमिक शाळा. जिची अवस्था नावाच्या अगदी विपरीत असते. शाळेचे मुख्याध्यापक अकर्तव्यदक्ष असल्याने शाळेचे दैनंदिन कामकाज रामभरोसे चालत असते. कामचुकार शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी, शिस्त नसणारे व शाळेत अनियमित उपस्थिती दर्शवणारे विद्यार्थी यामुळे शाळेची एकूण गुणवत्ता फार खालावलेली असते. ना शहर म्हणाव ना गाव अशा ठिकाणी असणारी ही शाळा असल्याने पालकही शिक्षणाच्या बाबतीत उदासिन. शाळेचे मुख्याध्यापक संस्थाचालकांचे जावई असल्याने ते सर्व काही माहित असताना सुद्धा याबाबतीत मुख्याध्यापकांना काही बोलु शकत नाहीत. या संस्कार विद्यालयाच्या अकर्तव्यदक्ष मुख्याध्यापकांच्या सेवानिवृतीनंतर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती असणारे संस्थेचे सचिव अरूण भिडे सरांना पदोन्नती देवून संस्कार विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी नियुक्ती करतात.
संस्कार विद्यालयाच्या मुख्याध्यापक म्हणून पदभार स्विकारल्यानंतर पहिल्याच दिवशी भिडे सरांच्या लक्षात येते की, त्यांच्या पूढे खूप मोठी आव्हाने आहेत. माणसाच्या ठिकाणी प्रबळ ईच्छाशक्ती असेल, डोळ्यासमोर विशिष्ट ध्येय असेल आणि ते साध्य करण्यासाठी कठिण परीश्रम करण्याची तयारी असेल तर अशक्य ते शक्य करता येते. भिडे सर हे शिवधनुष्य उचलतात. सुरुवातीला ते शाळेतील शिक्षकांचे समुपदेशन करतात. शाळेतील विद्यार्थ्यांचे मित्र बनतात. त्यांच्यात मिळून –मिसळून त्यांना शिस्त व अभ्यासाची गोडी लावतात. वेळोवेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात. यामुळे अल्पावधीतच ते विद्यार्थी प्रिय होतात. सुरूवातीला त्यांना विरोध करण्याची भाषा करणारे काही शिक्षक आपला विरोध सोडून देतात. संस्थेचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन, शिक्षकांचे सहकार्य, भिडे सरांचे उत्तम प्रशासन यामुळे लयाला गेलेली ही शाळा भिडे सरांनी मुख्याध्यापक म्हणून पदभार स्विकारल्यानंतर अगदी कमी काळात नावारूपाला येते.
शाळेची शिक्षक सभा, शाळेत चालणारे विविध उपक्रम आणि कार्यक्रम याचे यथोचित वास्तव चित्र उभा करण्यात लेखक यशस्वी झाल्याचे दिसून येते. ‘राजा कालस्य कारणम’ या उक्तीप्रमाणे राज्याची प्रगती असो अथवा अधोगती यास त्या त्या कालखंडातील राजाचे कर्तृत्व कारणीभूत असते, त्याप्रमाणे विद्यालयाचा प्रमुख हा मुख्याध्यापकही विद्यालयाच्या प्रगती अथवा अधोगतीस कारणीभूत असतो. म्हणून जर मुख्याध्यापक खास असेल तर विद्यालयाचा सर्वांगीण विकास हा हमखास होणारच. यात कोणाचेही दुमत असणार नाही. आणि हाच मुख्याध्यापक कर्तृत्ववान नसेल तर विद्यालयाच्या अधोगतीसही वेळ लागणार नाही. मुख्याध्यापक हा शिक्षक व प्रशासन याना जोडणारा दुवा असतो. त्या दोघांमधील सुवर्णमध्य साधणारा असतो. म्हणून मुख्याध्यापकामध्ये तेवढी विचारांची,अनुभवाची परिपक्वता असली तर तो विद्यालयाला नंदनवन बनवणारा महत्वाचा घटक ठरतो. त्याच्यामध्ये उत्कृष्ट सारथ्य असेल तर तर विद्यालयाचा रथ योग्य प्रगतिपथावरुन ध्येयपूर्तीकडे नेल्याशिवाय राहणार नाही.

माधव डाके सरांनी साध्या सरळ परंतु ओघवत्या वर्णन शैलीत हे पुस्तक लिहिलेले आहे. हे पुस्तक हाती घेतल्यानंतर पूर्ण वाचल्याशिवाय हातातुन सुटत नाही. ‘शाळा एके शाळा’ हे पुस्तक केवळ मुख्याध्यापकांसाठीच वाचनीय नाही तर संस्थाचालक, शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित प्रत्येकाने वाचावे असे आहे. माधव डाके सरांना पूढील लेखन कार्यासाठी खूप-खूप शुभेच्छा!
*पुस्तक –* शाळा एके शाळा
*लेखक -* माधव डाके.
*प्रकाशक -* कल्पना प्रकाशन, बीड
*किंमत –* १०० रुपये.
*पुस्तक परीक्षण :*
-सुरेश मंत्री, अंबाजोगाई.
*संपर्क-* ९४०३६५०७२२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!