रेल्वे डाक सेवेची एपीटी प्रणाली मंगळवारपासून कार्यान्वित
नाशिक रोड / लोकवेध live न्यूज
नाशिक रोड रेल डाक सेवा विभागात मंगळवारपासून (दि. २२ जुलै २०२५) एपीटी (APT) प्रणाली कार्यान्वित होणार आहे. डाक विभागाच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात असून, सुधारित आणि प्रगत प्रणालीमुळे कार्यक्षमता आणि व्यवहारातील पारदर्शकता वाढणार आहे.
नवीन प्रणालीची अंमलबजावणी सुरळीत व्हावी यासाठी दि. १९ ते २१ जुलै २०२५ या कालावधीत जुन्या प्रणालीचे अद्ययावतिकरण (अपग्रेडिंग) केले जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत नाशिक रोड रेल डाक सेवा विभागातील सर्व सार्वजनिक व्यवहार तीन दिवस बंद राहणार आहेत.
ग्राहकांनी या तांत्रिक प्रक्रियेमध्ये सहकार्य करावे, अशी विनंती उप अभिलेख अधिकारी आर.एम. खैरे यांनी केली आहे. नव्या प्रणालीच्या माध्यमातून रेल्वे डाक व्यवहार अधिक जलद, कार्यक्षम आणि ग्राहकाभिमुख होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
