संगमनेर जिल्हा निर्मितीसाठी एकजुटीची गरज – पक्षभेद बाजूला ठेवून नागरिकांनी यावे पुढे

संगमनेर  / लोकवेध live न्यूज

पुणे, नाशिक आणि मुंबई या महत्त्वाच्या महानगरांमध्ये वसलेले आणि त्रिवेणी संगमावर वसलेले संगमनेर हे केवळ एक तालुक्याचे ठिकाण नसून ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत समृद्ध व महत्वाचे ठिकाण आहे. आढळा, प्रवरा आणि म्हाळुंगी या तीन नद्यांच्या संगमावर वसलेले संगमनेर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात उपपरगणा म्हणून ओळखले जात होते. आजही अनेक ऐतिहासिक वास्तू, संत परंपरा आणि समाजहिताचे उपक्रम यामुळे संगमनेरचा लौकिक राज्यात आणि राज्याबाहेर पसरलेला आहे.

आजपर्यंत संगमनेरने कृषी, शिक्षण, आरोग्य, व्यापारी विकास आणि नागरी सुविधा यामध्ये मोठी प्रगती केली आहे. संगमनेरमधील सामाजिक चळवळी, स्वयंसेवी संस्था, शिक्षण संस्था, रुग्णालये आणि बाजारपेठा या सर्व गोष्टी संगमनेर जिल्हा बनण्याच्या पूर्ण पात्रतेला सिद्ध करतात. त्याचबरोबर संगमनेरचा भौगोलिक व्यापही जिल्हा म्हणून स्वतंत्र असण्यास पूरक आहे.

अहिल्यानगर जिल्ह्याचा प्रस्ताव सध्या चर्चेत आहे. त्याच धर्तीवर संगमनेर जिल्हा हा एक स्वाभाविक, ऐतिहासिक आणि सामाजिकदृष्ट्या योग्य असा प्रस्ताव असून, याबाबत संगमनेकरांनी आता एकत्र येण्याची नितांत गरज आहे. राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते, सामाजिक संस्था, तरुणाई, व्यापारी वर्ग आणि शेतकरी – सर्वांनी एकत्र येऊन ‘संगमनेर जिल्हा’ या मागणीसाठी आवाज उठवणे आवश्यक आहे.

राजकीय पक्ष कोणताही असो, विचारसरणी काहीही असो, पण संगमनेर जिल्ह्याचा मुद्दा हा सर्वसामान्य जनतेच्या भविष्याचा, सुविधा विकासाचा आणि स्वाभिमानाचा आहे. त्यामुळे या मुद्द्यावर सर्वांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून संगमनेरच्या हक्कासाठी लढा दिला पाहिजे.

आजपासून संगमनेर जिल्हा निर्मितीचा लढा अधिक ठोसपणे सुरु व्हावा, या मागणीसाठी जनजागृती, निवेदने, सभा, मोर्चे, पत्रव्यवहार, डिजिटल मोहिमा राबविण्यात याव्यात. संगमनेरच्या भविष्यासाठी ही एक गरज असून, “संगमनेर जिल्हा – आमचा हक्क, आमचा अधिकार” ही घोषणा सर्वत्र ऐकू यावी, अशी काळाची गरज आहे.

संगमनेर जिल्हा निर्मितीसाठी एकजुटीने पुढे या – हीच नम्र विनंती!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!