ग्रामीण पत्रकारितेचा दीपस्तंभ – डिग्रस (ता. संगमनेर) चे नवनाथ वावरे ‘युवा पत्रकार’ म्हणून सन्मानित
संगमनेर / लोकवेध live न्यूज
डिग्रस (ता. संगमनेर ) येथील सुपुत्र नवनाथ वावरे यांनी अल्पावधीतच आपल्या प्रगल्भ लेखनशैलीने आणि सामाजिक भानातून पत्रकारितेच्या क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. ग्रामीण भागात राहूनही प्रभावी पत्रकारिता कशी केली जाऊ शकते, याचा आदर्श त्यांनी आपल्या कार्यातून उभा केला आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत दैनिक युवा वार्ता वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित ‘युवा संवाद’ उपक्रमात त्यांना ‘युवा पत्रकार’ म्हणून सन्मानित करण्यात आले.
इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य व साहित्यिक डॉ. संतोष खेडलेकर आणि दैनिक युवा वार्ताचे संस्थापक-संपादक किसनभाऊ हासे यांच्या शुभहस्ते त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
नवनाथ वावरे हे केवळ पत्रकार नव्हेत, तर एक उत्कृष्ट लेखकसुद्धा आहेत. ग्रामीण जीवनातील वास्तव, शेतकऱ्यांचे दुःख, सामाजिक प्रश्न, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि प्रशासनाची अनास्था या विषयांवर त्यांनी अनेक अभ्यासपूर्ण आणि भिडणारे लेख लिहिले आहेत. त्यांच्या लेखनात नेमकेपणा, सुस्पष्टता आणि सामाजिक बांधिलकी प्रकर्षाने जाणवते.
त्यांनी महासत्ता न्यूज पोर्टलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडली आहे. जनतेच्या मनातील भावना त्यांनी शासनदरबारी पोहोचवल्या आहेत. अत्यंत कमी कालावधीत त्यांनी जे यश संपादन केले आहे ते नवोदित पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
डिग्रससारख्या गावातून, अत्यंत मर्यादित साधनसंपत्ती असतानाही त्यांनी पत्रकारितेचा एक आदर्श उभा केला. त्यांचा आवाज हा आज ग्रामपातळीवरील लोकांपासून जिल्हा व राज्य पातळीवरील अधिकार्यांपर्यंत पोहोचतो.
त्यांच्या या यशस्वी प्रवासाचा गौरव ‘दैनिक युवा वार्ता’ समूहाने केला असून, हा सन्मान केवळ नवनाथ वावरे यांचाच नव्हे, तर ग्रामीण पत्रकारितेच्या कर्तृत्वाचा आणि प्रामाणिक प्रयत्नांचा आहे.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असून, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेणारे असंख्य युवक आता सामाजिक प्रश्नांकडे पत्रकारितेच्या माध्यमातून पाहत आहेत.
नवनाथ वावरे हे आज ग्रामीण पत्रकारितेतील एक विश्वासार्ह, निडर आणि संवेदनशील नाव बनले आहे, हे निश्चित!
पत्रकार सुभाष भालेराव
