वाढदिवस साजरा करताना दिला ज्ञान आणि आरोग्याचा खजिना,डॉक्टर रिया बागुल यांचा प्रेरणादायी उपक्रम!”

वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य व दात तपासणी 

पिंपरणे (ता. संगमनेर) :

सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा एक स्तुत्य उपक्रम पिंपरणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत राबविण्यात आला. डॉक्टर रिया सुशील बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या, शार्पनर, शिसपेन्सिल व खोडरबर आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी “द डेन्टीस्ट” क्लिनिकच्या वतीने डॉक्टर सुशील बाळासाहेब बागुल यांनी विद्यार्थ्यांची मोफत दात तपासणी केली. विद्यार्थ्यांना दातांचे आरोग्य, स्वच्छता व योग्य देखभालीबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी स्वच्छ दातांचे महत्त्व सहज आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले. दात स्वच्छ ठेवण्याचे योग्य तंत्र, दररोज ब्रश करण्याचे फायदे याविषयी सखोल माहिती दिली.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून डॉक्टर रिया बागुल यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. नंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊवाटपही करण्यात आले. त्यामुळे मुलांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय उत्तम बोर्से सर होते. त्यांनी डॉक्टर रिया बागुल यांना वाढदिवसानिमित्त गुलदस्ता देऊन शुभेच्छा दिल्या. शाळेतील शिक्षक श्रीमती प्रतिभा दुर्गुडे, श्रीमती सरला सातपुते, श्रीमती अनिता मुरडनर व श्री. नामदेव राहाणे सर यांनीही शुभेच्छा व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले.

हा उपक्रम केवळ वाढदिवसापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि आरोग्यविषयी जागरूकता निर्माण करणारा ठरला. समाजासाठी प्रेरणादायी ठरणारा हा एक सकारात्मक उपक्रम असल्याचे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!