ज्ञानदानाचे सशक्त पाऊल : मोरेवाडी शाळेत शालेय साहित्य व शालेय बॅग वाटप
अंबेजोगाई / लोकवेध live न्यूज / सुरेश मंत्री
शिक्षण हीच खरी शक्ती या भावनेतून अंबाजोगाई तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोरेवाडी येथे दिनांक २६ जुलै रोजी एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. ईनरविल क्लब अंबाजोगाई आणि तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पहिली व दुसरीच्या एकूण ४० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व शालेय बॅगचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे अध्यक्षस्थान तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को.ऑप. बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. संभाजी डाके यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून ईनरविल क्लबच्या अध्यक्षा सौ. संगीता नावंदर, सौ. जयश्री कराड, सौ. ठाकूर मॅडम तसेच लक्ष्मण जाधव साहेब हे उपस्थित होते. कार्यक्रमाला ईनरविल क्लबच्या सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन बनसोडे मॅडम यांनी आत्मीयतेने पार पाडले. शाळेतील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह पाहता, कार्यक्रमाचा हेतू सफल झाल्याचे स्पष्ट दिसून आले.
विशेष म्हणजे, ईनरविल क्लब व तुळजाभवानी अर्बन मल्टीस्टेट को.ऑप. बँकेचे एक महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट म्हणजे तालुक्यातील तब्बल १०,००० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किट वितरित करणे! समाजातील शिक्षणप्रेमी संस्था आणि बँकांनी पुढाकार घेऊन शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या या योगदानाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
