नैतिक मूल्यांचा –हास होतोय ….
कोणत्याही देशासाठी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते. तिथल्या नागरिकांमध्ये नैतिक मूल्य असावी लागतात. कोणत्याही धर्म, जात आणि पंथाच्या लोकांना त्या देशात मान-सन्मान मिळायला हवा. आज आपला देश प्रगतीच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय. पण आजकाल दोन समाजांमध्ये वाद, भांडणं आणि त्याचं रूपांतर हिंसेमध्ये अगदी सहज होत आहे. धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर रक्तपात घडवून आणले जात आहेत. अंधश्रद्धा, अज्ञानता, व्यसनाधिनता, भांडण-तंटे, स्वार्थ, विश्वासघात, गृहकलह, नात्यातील अविश्वास, भ्रष्टाचार इत्यादी जुन्या समस्यांसुद्धा कायम आहेत. शिक्षणामुळे सुद्धा त्यात फारसा फरक पडलेला नाही आणि पडणार देखील नाही. कारण समाजात शिक्षणाच्या नावाखाली जे काही शिकविले जाते त्यातून विद्यार्थी पैसा कसा कमवावा? याचे कौशल्य तर आत्मसात करतात मात्र नैतिक वर्तन कसे करावे? याचे कौशल्य आत्मसात करीत नाहीत. कारण त्यांना ते शिकवलेच जात नाही. माणूस म्हणून कसे वागावे ? दुस-यांच्या प्रती दया,करूणा, त्याग व निःस्वार्थ प्रेम कसे करावे ? यासंबंधीचे शिक्षण कुठल्याही विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सामील नाही. पालक सुद्धा आपल्या मुलांवर नैतिक संस्कार करण्यात सपशेल अपयशी ठरत आहेत. कारण ते स्वतःच नैतिक मुल्यांनी रिकामे आहेत. परिणामी मूल्यहीन पिढी अस्तित्वात येत आहे व त्यांची संख्या पिढीगणिक वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये एखादा देश प्रगती करतही असेल, तरी ती प्रगती फार काळ टिकणं अशक्य आहे.
सोशल मीडियाचा शोध दूर असलेल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्यात संवाद साधण्यासाठी लागला होता, पण आता त्याचे विपरित परिणाम दिसू लागले आहेत. विशेषतः तरुण पिढी त्यात जास्तच गुंतत गेली आहे. ती या आभासी दुनियेलाच सर्वस्व मानायला लागली आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप, स्नॅपचॅट ही ॲप्स अक्षरशः तरुण व किशोरवयीन मुला-मुलींना वेड लावत आहेत. परिणामी त्यांच्यासाठी मोबाईल जीव की प्राण होत चालला आहे. सोशल मीडियाच्या आहारी जाऊन लोक सोशल न राहता एकलकोंडे होत आहेत. सोशल मीडियात वनवे कम्युनिकेशन मुळे लाईक्स, कमेंट, व्ह्युव्हज या गोष्टी म्हत्वाच्या वाटु लागल्या आहेत. आनंद म्हणजे पैसा आणि प्रसिद्धी असाच समज वाढत आहे. त्यातून तरूण स्वत:च स्वत:च आभासी जग तयार करून त्यात रममान होत आहेत.
मोबाईल वरील अश्लील सामुग्री, ओटीटी प्लेटफार्मस, चित्रपट आणि टिव्ही वरील दर्जाविहीन कार्यकमांमुळे समाज खालपासून वरपर्यंत नासत चाललेला आहे व ह्या नासण्याच्या प्रक्रियेपासून समाजाला वाचविण्याचा कोणताच मार्ग दिसत नाहीये, ही समस्या आता विद्यापीठ, महाविद्यालयांतून झिरपत माध्यमिक शाळांपर्यंत येऊन पोहोचली आहे., मुलांच्या हाती मोबाईल देणे गरजेचे आहे परंतु त्या मोबाईलमधील अश्लील सामुग्रीच्या वाईट परिणामांपासून आपल्या मुला-मुलींना कसे वाचवावे, हे पालकांना कळत नाहीये. या सामुग्रीमुळे तरूणच नव्हे तर सर्व वयोगटातील लोकांच्या लैंगिक अभिरूची आणि वर्तनामध्ये कमालीचे बदल झालेले आहेत. या सर्वाचा परिणाम म्हणून देशातील स्त्रिया असुरक्षित झालेल्या आहेत. शालेय, महाविद्यालयीन मुलींवर आणि महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या आणि छेडछाडीच्या देशाच्या कानाकोपऱ्यांतील बातम्या वाचल्या आणि मन अगदी सुन्न आणि अस्वस्थ झालंय. समाजात राजकारणाचे गुन्हेगारीकरण किंवा गुन्हेगारांचे राजकारीकरण मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. शिक्षणाचे बाजारीकरण झाले असून बेरोजगारी मुळे समाजातील तरूण गुन्हेगारी कडे वळत आहेत. समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. भारतीय समाजाच्या सामाजिक आणि मानसिक नैतिकतेवर अंतराष्ट्रीय पातळीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय हे खूप खेदजनक आणि लांच्छनास्पद आहे.
चार्ल्स डार्विनने आपल्या नैसर्गिक निवडिच्या सिद्धांतात म्हटलं आहे, निसर्गच कुणाला जगु द्यायच आणि कुणाला नाही हे ठरवतो. सक्षम असतील तेच टिकतील. मग माणुस तरी याला अपवाद कसा राहील. आज माणसांमध्ये जगण्यासाठी जीवघेणी स्पर्धा सुरू झाली आहे. त्यामुळे तो पैशाला इश्वराचे जणू स्थान देवून पूजायला लागला आहे. आज झगमगाटाच्या दुनियेत अधिकाधिक संपत्ती, बंगला, गाडी, फ्लॅटस या बाबींना त्यान स्टेटस सिंबाल बनवलं आहे व एवढा आत्ममग्न झाला आहे की, समाजापासून दूर व्हायला लागला आहे. एकएकट्याचा, स्वतःचाच विचार करण्याच्या प्रंमाणात वाढ झाली आहे. आज जो-तो केवळ यंत्रासारखा पळतो आहे. एक-दुस-याला मदत करण्याची भावना कमी होत चालली आहे. भारतीय समाज आपल्या सामाजिक प्रश्नाच्या जटील सोडवणुकीत मात्र दिवसेंदिवस नैतिक अध:पतनाकडे का जातोय हा प्रश्न मात्र अस्वस्थ करून सोडतोय..
*-सुरेश मंत्री, अंबाजोगाई.*
*संपर्क :* ९४०३६५०७२२
