कष्टकरी महिलांसाठी “शिवराज्य निर्माण संघटनेचा” अनोखा उपक्रम
पिंपरणे येथे महिलांना सन कोट व हॅटचे वाटप
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुका सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच आघाडीवर राहिला आहे. याच परंपरेला पुढे नेत राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी 2017 साली शिवनेरी किल्ल्यावर या शिवराज्य निर्माण संघटनेची स्थापना केली सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या संघटनेने तालुक्यातील पिंपरणे गावात एक स्तुत्य उपक्रम राबविला . शेतात दिवसेंदिवस कष्ट करणाऱ्या महिलांना उन्हापासून संरक्षण मिळावे या उद्देशाने संघटनेतर्फे सन कोट (उन्हाळी अंगरखा ) व डोक्यावर परिधान करण्यासाठी हॅटचे वाटप करण्यात आले.
पिंपरणे परिसरात मोठ्या प्रमाणावर महिला शेतकामात कार्यरत असतात. तीव्र उन्हात शेतात राबणाऱ्या महिलांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर महिलांचे आरोग्य जपण्यासाठी आणि उन्हाच्या दाहकतेपासून बचाव व्हावा, या हेतूने शिवराज्य निर्माण संघटनेने हा उपक्रम राबविला.
यावेळी राजहंस दूध संघाचे संचालक रवी रोहम, राजेंद्र देशमुख, संतोष वाकचौरे, संजय बागुल, निलेश बागुल, धनंजय देशमुख, निलेश रोहम, राहुल दिवेकर, कांतीलाल साळवे व भाऊराव कुदळ आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते महिलांना उन्हाळी अंगरखा व हॅटचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या वेळी बोलताना संघटनेचे कार्यकर्ते म्हणाले की, “शेतात काम करणाऱ्या महिला समाजाच्या कणा आहेत. त्यांच्यामुळेच शेती उत्पादनात वाढ होते. पण त्यांच्या आरोग्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. उन्हामुळे त्वचारोग, डोकेदुखी, उष्माघात यांसारख्या समस्या महिलांना वारंवार भेडसावत असतात. या समस्या टाळण्यासाठी साध्या साध्या उपाययोजना करता येऊ शकतात. त्यापैकीच एक उपाय म्हणजे शेतात काम करताना योग्य कपडे व हॅट परिधान करणे.”
शिवराज्य निर्माण संघटनेने केलेल्या या उपक्रमाचे कष्टकरी महिला,शेतकरी व ग्रामस्थांनी कौतुक केले. महिलांनीही आनंद व्यक्त करत सांगितले की, “शेतात दीर्घकाळ उन्हात काम करताना होणारी झळ आता काही प्रमाणात तरी कमी होईल.”
शिवराज्य निर्माण संघटनेच्या सामाजिक जाणिवेचे हे उत्तम उदाहरण आहे. गावागावांत या संघटनेने समाजकार्याचा ध्यास घेताला आहे केवळ आर्थिक मदतीवर न थांबता प्रत्यक्ष आरोग्यदायी उपक्रम हाती घेतात, ही बाब निश्चितच प्रेरणादायी आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवराज्य निर्माण संघटनेचे कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थांनी मेहनत घेतली. शेवटी उपस्थित मान्यवरांनी भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांची सांगड घालून समाजहितासाठी कार्य करत राहण्याचा संकल्प व्यक्त केला.

