“फटाके नाही, केक नाही – शाळकरी मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा वाढदिवस उत्सव”
संगमनेर / लोकवेध live न्यूज
पिंपरणे गावातील सामाजिक कार्यकर्ते किशोर जोर्वेकर यांनी आपला वाढदिवस अत्यंत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करून एक वेगळा आदर्श निर्माण केला. नेहमी केक, फटाके व जल्लोषात वाढदिवस साजरे करण्याची परंपरा असताना, जोर्वेकर यांनी मात्र शाळकरी मुलांच्या सहवासात गप्पागोष्टी व हितगुज साधत, विद्यार्थ्यांना फरसाण वाटप करून आपला वाढदिवस आनंदोत्सवात परिवर्तित केला.
या अनोख्या उपक्रमामुळे पिंपरणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर पसरली. लहानग्या मुलांसोबत गप्पा मारत, त्यांना प्रोत्साहनपर शब्द देत, त्यांच्या छोट्या इच्छा जाणून घेत जोर्वेकर यांनी दिवस खास केला. मुलांनीही त्यांच्या वाढदिवसानिमित्त गाणी म्हणत व टाळ्यांचा कडकडाट करत उत्साहाने सहभागी होत आपला आनंद व्यक्त केला.
यावेळी राजहंस दूध संघाचे संचालक रवी रोहम, पिंपरणे गावचे सर्पंच नारायण मरभळ, उपसरपंच मिनीनाथ जोर्वेकर, संजय बागुल, मुख्याध्यापक संजय बोरसे तसेच शिक्षक प्रदीप बागुल सर आदी मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक बांधिलकी जपणारा व मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणारा हा वाढदिवस गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. समाजहिताचे उपक्रम म्हणजेच खरी आनंदाची गुरुकिल्ली असल्याचा संदेश जोर्वेकर यांच्या या कृतीतून अधोरेखित झाला.
गावकऱ्यांनी आणि उपस्थित मान्यवरांनी जोर्वेकर यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत, त्यांच्या सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
