संघर्षातून उजळलेला दीपस्तंभ : आण्णासाहेब खंडू जगनर

गरीबीच्या सावल्यांमध्ये जन्म घेऊनही आयुष्याला स्वतःच्या परिश्रमांनी उजळवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे आण्णासाहेब खंडू जगनर. त्यांच्या जीवनप्रवासाची गाथा म्हणजे एका साध्या शेतकरी लेकराने स्वप्नं पाहण्याचं धाडस केलं, ती घामाच्या धारांनी पेरली आणि समाजकल्याणासाठी झगडत प्रत्यक्षात आणली, अशी प्रेरणादायी कहाणी.

कुटुंबात वडीलोपार्जित संपत्ती असूनही नियतीने माय-लेकरांच्या पदरात संघर्ष आणि अश्रूंचा वनवासच दिला. जसा श्रीराम राज्याभिषेकाच्या उंबरठ्यावर असताना वनवासाला गेला, तसाच प्रसंग या कुटुंबावर ओढवला. पण हा वनवास त्यांना खचवणारा नव्हता; उलट घडवणारा ठरला. अंगावरचे कपडे, तुटपुंज्या साधनांवर संसाराचा गाडा हाकताना घाम, मेहनत आणि जिद्द यांना सोबती करून त्यांनी जीवनाच्या अंधारातून प्रकाशाचा मार्ग शोधला.

शिक्षणासाठीही त्यांचा संघर्ष तितकाच मोठा होता. प्राथमिक शिक्षण आंभोरे येथे आणि माध्यमिक शिक्षण पिंपरणे येथे कसाबसा पूर्ण केला. पुढे पशुवैद्यकीय डिप्लोमा घेत, त्यांनी स्वतःसाठी नवा मार्ग तयार केला. खाजगी नोकरीतून सुरुवात केली, पण मेहनतीमुळेच त्यांना मोठी संधी मिळाली. तब्बल अकरा वर्षे ते महानंद दूध महासंघ व राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांचे स्विय्य सहाय्यक म्हणून कार्यरत राहिले. ही केवळ नोकरी नव्हती, तर एक प्रकारची अग्निपरीक्षा होती. या काळात त्यांनी सहकार क्षेत्रातील कार्यपद्धती, प्रशासकीय कौशल्य, तसेच लोकांशी संवाद साधण्याची कला आत्मसात केली.

देशमुख साहेबांसोबत सावलीसारखे उभं राहत त्यांनी राज्यातील असंख्य दूध संघांशी जनसंपर्क वाढवला, शेतकऱ्यांचे हित साधले. त्यांची दृष्टी व्यापक झाली, समाजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्याचबरोबर वारकरी संप्रदायातील महान संत मंडळींचा निकट परिचय झाल्यामुळे त्यांच्यातील आध्यात्मिकता आणखी बहरली.

आज आण्णासाहेबांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे साधेपणा, प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुखता यांचा सुंदर संगम आहे. यशाच्या शिखरावर पोहोचूनही ते आजही जमिनीवर पाय रोवून उभे आहेत. कुटुंबाच्या सुखदुःखात सह्याद्रीसारखे खंबीर राहणे, संकटात आधार देणे आणि समाजाप्रती बांधिलकी जपणे – हेच त्यांचं खरे मोठेपण आहे.

त्यांचा प्रवास शिकवण देतो – गरीबी दोष नसते; उलट तीच उभारीचा पहिला धडा असतो. आज त्यांच्या कामाचा ठसा अनेकांच्या मनावर उमटलेला आहे.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजमनातून एकच शुभेच्छा दुमदुमते – “त्यांचा पुढील प्रवास आणखी प्रेरणादायी ठरो, त्यांचे कार्य समाजासाठी नवे मार्ग दाखवो आणि त्यांचे आयुष्य यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचो.”


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!