वारकरी संप्रदायात घुसलेले
मंबाजी शोधून काढले पाहिजे
संगमनेर येथील वारकरी चिंतन परिषद जेष्ठ कीर्तनकारांचे मत

संगमनेर

 

वारकरी संप्रदायात पांढरे कपडे घालून काही मंबाजी घुसले आहेत. ज्यांनी तुकाराम महाराजांना त्रास दिला, त्या प्रवृत्ती आजही शिल्लक आहेत. अशा ढोंगीना शोधून वारकरी संप्रदायाने बाहेर काढले पाहिजे, असे मत संगमनेर येथील भागवत धर्म चितनी वारकरी समाज परिषदेत ज्येष्ठ कीर्तनकारांनी व्यक्त केले. संयोजकांनी कीर्तनकारांना बोलावतानाच त्यांना आचारसंहिता घालून द्यावी, असे मतही या वेळी सर्व जेष्ठ कीर्तनकारांनी व्यक्त केले.
सकल वारकरी समाजाच्या वतीने संगमनेर येथील श्री विठ्ठल मंदिर ऑफ नामदेव शिंपी समाज येथे राज्यस्तरीय वारकरी समाज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे मठाधिपती भारत महाराज जाधव होते. तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे उपस्थित होते. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मुख्य चोपदार राजाभाऊ चोपदार, विचारवंत आणि कीर्तनकार डॉ. बालाजी जाधव, रिंगणचे संपादक सचिन परब, पत्रकार कीर्तनकार शामसुंदर महाराज सोन्नर आदी उपस्थित होते.
उद्घाटनपर मनोगतात बोलताना ज्ञानेश्वर महाराज वाबळे म्हणाले की वारकरी संप्रदाय हा सर्व समावेशक आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणार आहे. कोणाचीही निंदा, द्वेष तिरस्कार करणारा नाही, परंतु दुर्दैवाने आज या संप्रदायांमध्ये जात धर्मावरून अत्यंत विषमतेचे फुत्कार टाकले जात आहेत. वारकरी संतांच्या विचारावर श्रद्धा असणाऱ्या कीर्तनकार, फडकरी, दिंडेकरी यांनी एकत्र येऊन अशा वारकरी वेशात घुसलेला मंबाजीना शोधून संप्रदाया बाहेर काढले पाहिजे, असे परखड मत वाबळे महाराजांनी यावेळी व्यक्त केले
यावेळी बोलताना ज्ञानेश्वर महाराज दिंडी सोहळ्याचे प्रमुख राजाभाऊ महाराज चोपदार यांनी वारकरी संप्रदायाच्या वैचारिक ऐश्वर्याचा आढावा घेऊन, बदलत्या कीर्तन पद्धतीवर भाष्य केले. कीर्तनकाराची भाषा बदलण्यासाठी कीर्तनकार जितके जबाबदार आहेत, तितकेच संयोजक ही जबाबदार आहेत, असे ते म्हणाले. ज्यांना वारकरी संप्रदाय टिकवायचा आहे, त्यांनी कीर्तनकारांसाठी आचारसंहिता तयार करावी. ती आपल्या मंदिरात लावावी आणि कीर्तनाला उभे राहण्यापूर्वी ती आचारसंहिता वाचायला लावूनच कीर्तनकाराला कीर्तनाच्या गादीकडे जाऊ द्यावे. एखाद्या सप्ताहामध्ये एकाच अभंगावर सात दिवस सात महाराजांनी कीर्तन करावे, असे प्रयोग करणे हे वारकरी संत विचाराचा चिकित्सकपणे अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल, असे मत चोपदार महाराजांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना डॉ बालाजी जाधव यांनी सध्याच्या कीर्तनात बाष्कळ विनोद, टिंगल-टवाळी आली आहे ती टाळली पाहिजे. संतांनी घालून दिलेल्या समतेच्या विचारावर कीर्तन परंपरा असावी. यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. जाती धर्मावरून द्वेष करणारा वारकरी कीर्तनकार असू शकत नाही असेही ते म्हणाले

कीर्तनकार राजकीय पक्षाचे प्रचारक असल्याचे आज दिसत असले, तरी राजकीय पक्षांचा छुपा प्रचार करणारे यापूर्वी अनेक प्रसंग झालेले आहेत, असे मत रिंगण अंकाचे संपादक सचिन परब यांनी व्यक्त केले. आपल्या वक्तव्याचा खुलासा करताना त्यांच्या जीवनातील बालपणीचा एक प्रसंग त्यांनी उद्गृत केला. ते म्हणाले मी कोकणातील आहे. माझ्या आजी बरोबर मी अनेक वेळा पंढरपूरच्या वारीला गेलो आहे. एका पंढरपूरच्या वारीला गेलो असताना देगलूरकर मठामध्ये चालणाऱ्या चातुर्मासाच्या प्रवचनाला ऐकायला मी बसलो होतो. तो काळ लालकृष्ण अडवाणी यांनी राम मंदिरासाठी काढलेल्या रथयात्रेचा होता. ज्या दिवशी मी प्रवचनाला गेलो होतो त्यादिवशी लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा बिहारमध्ये पोहोचणार होती. बिहारचे नेते लालूप्रसाद यादव यांनी ही रथयात्रा रोखली होती. ही बातमी कळाल्यानंतर देगलूरकर फडावर त्यादिवशी अडीच तास प्रवचन झाले. ज्या प्रवचनात समोर तुकाराम महाराजांची गाथा ठेवली होती. पण गाथ्यावर एकही शब्द न बोलता अडीच तास संपूर्ण राजकीय भाष्य झालं होतं. याची आठवण सचिन परब यांनी करून दिली. त्या त्या वेळच्या धर्मपिठाने संतांना त्रास दिलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांना वाळीत टाकले, संत तुकाराम महाराजांची गाथा बुडवली हे धर्मपिठाने केले आहे. त्यामुळे संतांचा आणि धर्मपिठाचा नेहमीच संघर्ष राहिलेला आहे. महात्मा गांधी यांनी तुकाराम महाराजांच्या सोळा अभंगांचे इंग्रजीत भाषांतर केले आहे. महात्मा गांधींचा संत विचारावर दृढ विश्वास होता, ते महात्मा गांधी वारकऱ्यांना प्रिय असले पाहिजे. मात्र आज त्या महात्मा गांधीना मारणारा नथुराम कीर्तनकारांना प्रिय वाटत असेल तर ही केवळ कीर्तनकारांना नाही, वारकऱ्यांना नाही तर संपूर्ण समाजाला लाजिरवाणी गोष्ट आहे, असेही सचिन परब म्हणाले.
समारोप करताना अध्यक्षीय मनोगतात पंढरपूरचे संत कैकाडी महाराजांचे उत्तराधिकारी भारत महाराज जाधव यांनी सर्वधर्मसमभाव यावर आक्षेप घेणाऱ्या कीर्तनकारांचा चांगला समाचार घेतला. ते म्हणाले सर्वांप्रति समभाव असणे हाच खरा वारकरी धर्म आहे. तो ज्यांना मान्य नाही तो वारकरी असू शकत नाही. म्हणूनच सर्व ज्येष्ठांनी एकत्र येऊन कीर्तनकारांसाठी आचारसंहिता तयार करावी आणि त्याचे पालन सर्वांनी करावे असेही भारत महाराज जाधव म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारत महाराज घोगरे गुरुजी यांनी, सूत्रसंचालन सोमनाथ मदने यांनी तर आभार प्रदर्शन बाळकृष्ण महाराज कर्पे यांनी केले. समाधान महाराज देशमुख यांच्या पसायदान गायनाने वारकरी समाज परिषदेचा समारोप झाला.कार्यक्रम यशस्वितेसाठी संत पीठाचे विश्वस्त राजाभाऊ अवसक, अविनाश पाटील, शरद कदम, दीपक देवरे, सरस्वती शिंदे, रजत अवसक,राजेंद्र शित्रे,जयवंत भोंडवे, नागेश जाधव, सुखदेव इल्हे, बाळासाहेब पिंगळे, अर्जुन वाळके यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!