कनोलीत मानवी व नैसर्गिक आपत्ती विषयावर गॉड्स असेंबल मिनिस्ट्रीचा नाविन्यपूर्ण उपक्रम

संगमनेर तालुका / कनोली (प्रतिनिधी) –

गॉड्स असेंबल मिनिस्ट्री या संस्थेच्या वतीने कनोली गावात दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी “मानवी आपत्ती व नैसर्गिक आपत्ती” या विषयावर एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा उज्वलाताई जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी कनोली गावचे सामाजिक कार्यकर्ते मच्छिन्द्र जगताप सर, नाशिक प्रभाग प्रमुख काळे सर व शेळके सर यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष ऊर्जामय वातावरण लाभले.

या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मच्छिन्द्र जगताप यांनी मानवनिर्मित आपत्तींचा विस्तृत आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, “मानवनिर्मित आपत्ती मानवी निष्काळजीपणा, चुका किंवा हेतुपुरस्सर कृतींमुळे उद्भवतात. यासाठी नागरिकांना सुरक्षा नियम, वाहतूक शिस्त व पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूक करणे अत्यंत आवश्यक आहे. शाळा-कॉलेज स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणे हाच समाजाचा खरा बचाव होईल.”

त्यांनी युद्ध व हिंसा टाळून संवादातून मतभेद सोडविणे, जंगलतोड थांबवून पर्यावरण संतुलन राखणे, प्रदूषण कमी करणे, कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे या बाबींवर विशेष भर दिला. डिजिटल युगात वाढत्या धोक्यांच्या पार्श्वभूमीवर सायबर सुरक्षा महत्त्वाची असून त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि नागरिकांमध्ये जागृती आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नैसर्गिक आपत्तींचा आढावा घेताना त्यांनी भूकंप, पूर, चक्रीवादळ, दुष्काळ, भूस्खलन, ज्वालामुखी, त्सुनामी अशा आपत्तींची उदाहरणे दिली. अशा आपत्तीमुळे जीवितहानी, आर्थिक नुकसान, अन्न-पाण्याची टंचाई, स्थलांतर आणि सामाजिक संकट उद्भवते. म्हणूनच पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि नैसर्गिक संतुलन राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांनी हा उपक्रम अत्यंत माहितीपूर्ण आणि समाजहिताचा ठरल्याचे मत व्यक्त केले. गावकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा हा प्रयत्न प्रशंसनीय असल्याचे मान्यवरांनी गौरवोद्गार काढले.

गॉड्स असेंबल मिनिस्ट्री संस्थेचा हा सामाजिक उपक्रम कनोलीसारख्या ग्रामीण भागात एक प्रेरणादायी पाऊल ठरले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!