वर्दीतील नवदुर्गांचा सन्मान – व्हाईस ऑफ मीडिया महिला विंगचा स्तुत्य उपक्रम
संगमनेर/ लोकवेध live न्यूज
नवरात्र म्हणजे नारीशक्तीचं पर्व. जगज्जननी दुर्गा हिच्या नऊ रूपांची उपासना करीत प्रत्येक भाविक तिच्या शक्तिरूपाची आराधना करतो. या धार्मिक आणि भावनिक वातावरणात संगमनेर शहरात एक अनोखा उपक्रम राबवला गेला. घरदार सांभाळत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समाजरक्षणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या वर्दीतील नवदुर्गा – म्हणजेच महिला पोलिसांचा सन्मान व्हाईस ऑफ मीडिया महिला विंग तर्फे करण्यात आला.
या प्रसंगी शहर पोलीस ठाण्यातील सर्व महिला पोलीस कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प व टिफिन बॉक्स देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, व्हाईस ऑफ मीडिया महाराष्ट्रचे मुख्य संयोजक गोरक्षनाथ मदने, राज्य कोअर कमिटी सदस्य अमोल मतकर, पत्रकार भारत रेघाटे, सुभाष भालेराव, महिला विंग जिल्हाध्यक्ष वैशाली कुलकर्णी, सचिव नीलिमा घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
लता जाधव, सुजाता थोरात, चारुशीला गोणके, तारा चांडे, अरुणा गभाले, सुवर्णा नवले, जया गभाले, मनिषा पुरी, किरण कातोरे, सोमेश्वरी शिंदे, अनिता सरगच्चे, संगीता डुंबरे, अनिता गीते, आरती पानसरे, छाया बढे, निशा घोडे या महिला पोलिसांचा या वेळी प्रतिनिधिक सत्कार झाला.
या वेळी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करताना महिला पोलीस लता जाधव म्हणाल्या – “आज पत्रकारांकडून हा सन्मान मिळाल्याने आम्हाला अपार आनंद झाला. आम्ही आमच्या कर्तव्यावर दक्ष असताना घरच्या सर्व जबाबदाऱ्या देखील पार पाडतो. कधी कठोर तर कधी कोमल व्हावं लागतं. समाजातील अन्यायग्रस्त महिलांना मदत करण्यासाठी आम्ही सदैव सज्ज असतो. नारी अबला नसून तिच्यात अपार सहनशक्ती आहे; प्रसंगी तीच कालिका रूप घेते.”
महिला विंग जिल्हाध्यक्ष वैशाली कुलकर्णी यांनी या उपक्रमाचा हेतू स्पष्ट करताना सांगितले की – “महिला पोलिसांनी कुटुंब आणि नोकरीच्या धावपळीत स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. नवरात्राच्या पावन पर्वात त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा हा आमचा उद्देश आहे.”
या उपक्रमाचं शहर पोलिसांकडूनही कौतुक करण्यात आलं. नवरात्रात ज्या नवदुर्गांची पूजा केली जाते, त्याच स्वरूपातील या वर्दीतील नवदुर्गा समाजरक्षणाचं कार्य करत असल्याने हा सन्मान नवरात्राचा धार्मिक आणि भावनिक संदेश जनतेपर्यंत पोहोचवणारा ठरला.
नवरात्राच्या देवीप्रमाणेच या महिला पोलिसांनी अन्यायाविरुद्ध रणरागिणी बनून, समाजात न्यायाची ज्योत तेवत ठेवली आहे. त्या खऱ्या अर्थाने आधुनिक दुर्गा आहेत.
