“डॉ. संपदा मुंडे प्रकरणात राजकीय हस्तक्षेप नको; दोषींवर कठोर कारवाई व्हावी” — राहुल गांधी समर्थक संघाची मागणी
संगमनेर (प्रतिनिधी) :
फलटण येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या कथित हत्या प्रकरणातील दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच या प्रकरणात कोणताही राजकीय दबाव झुगारून निष्पक्ष तपास व्हावा, अशी ठाम मागणी ‘राहुल गांधी समर्थक संघ, महाराष्ट्र’ यांच्यावतीने करण्यात आली.
या संदर्भात काल (मंगळवार, २८ ऑक्टोबर) संघाच्या वतीने संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की — डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याच्यावर बलात्कार केल्याचा, तसेच प्रशांत बनकर आणि इतरांकडून शारीरिक व मानसिक छळ सहन करावा लागल्याचा गंभीर आरोप केलेला आहे.
महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्यांच्याच विरोधात असे आरोप होणे, ही प्रशासनासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब असून, अशा अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई न झाल्यास महिलांच्या सुरक्षिततेवरील विश्वास उडेल, असेही संघाने स्पष्ट केले.
या प्रकरणातील आरोपींना वाचविण्यासाठी काही राजकीय व्यक्तींनी दबाव टाकल्याचा आरोपही संघाने केला आहे. यात माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर, त्यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र शिंदे आणि रोहित नागतिळे यांची नावे नमूद केली गेली आहेत. पीडित डॉ. मुंडे यांच्या कुटुंबानेही राजकीय दडपशाही होत असल्याचे सांगून न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
या सर्व घटनांमुळे समाजात असंतोष निर्माण झाला असून, महिला अधिकाऱ्यांवरील अत्याचारासंबंधीच्या तक्रारींना गांभीर्याने घेऊन भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनात आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी संघाने केली आहे.
तसेच, या मागण्यांचे निवेदन जिल्हा पोलीस अधिक्षकांमार्फत सातारा पोलीस आयुक्तांकडे पाठविण्यात यावे, अशीही विनंती करण्यात आली.
हे निवेदन *‘राहुल गांधी समर्थक संघ, महाराष्ट्र’*च्या वतीने अमोल शेलकर, राम अरगडे, प्रकाश कडलग, सतीश खताळ, मोहसीन शेख, कल्याण जोर्वेकर, अरुण गावित्रे, अक्षय मोहिते, शंतनू भालेकर, अनिल राऊत, भरत कळसकर आदी कार्यकर्त्यांनी सादर केले.
