नाद करा पण आमचा कुठं , नवऱ्याची हौस
बायकोच्या वाढदिवसाला चक्क गौतमी पाटील नाचवली !
गौतमीच्या हाताने केकही कापला. मग काय गावात चर्चा होणार आणि विषय रंगणार..!
संगमनेर / लोकवेध live न्यूज
गौतमी पाटीलच्या नृत्याची क्रेझ आज संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर तर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. गौतमीच्या प्रत्येक कार्यक्रमाला गर्दी ही होतीच. कधीकधी तर तिच्या कार्यक्रमात हाणामारी झाल्याची घटना देखील घडली आहे. आता गावोगावी जत्रा- यात्राचा सीझन सुरू आहे. मग काय सगळीकडे गौतमीच्या कार्यक्रमाचे आय़ोजन करण्यात येत आहे. शिवाय याही पुढं जाऊन लोकं आता गौतमीला घरगुती कार्यक्रमाचं देखील आमंत्रण देत आहेत. एका पठ्ठ्याने तर बायकोच्या वाढदिवसानिमित्ताने चक्क गौतमी पाटीलचा डान्स ठेवला. गौतमीच्या हाताने केकही कापला. मग काय गावात चर्चा होणार आणि विषय रंगणार..
प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करताना दिसते. त्यात बायकोचा वाढदिवस म्हटल्यांवर विषयच वेगळा असतो. एका पठ्ठ्याने तर बायकोच्या वाढदिवसानिमित्ताने चक्क गौतमी पाटीलचा डान्स शो ठेवला. आष्टी तालुक्यातील निमगाव बोडखा येथील किरण गावडे यांची पत्नी प्रगती गावडे यांचा वाढदिवस सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या कार्यक्रमाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
पत्नीच्या वाढदिवसानिमित्त चक्क नृत्यांगना गौतमी पाटील हिचा डान्स शो ठेवण्यात आला होता. गौतमी पाटील हिच्या हस्ते केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. या अनोख्या वाढदिवसाला भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी तरुणाईंनी देखील मोठी गर्दी केली होती. अशा पद्धतीनं बायकोचा वाढदिवस साजरा केल्याने गावात सगळीकडं या वाढदिवसाची चर्चा रंगली आहे.
या वाढदिवसाला गौतमी पाटील मराठमोळ्या पद्धतीने वेश परिधान करून आली होती. तर वाढदिवसासाठी मोठा केक आणण्यात आला होता. प्रगती यांनी केक कापल्यानंतर हा केक गौतमीला भरवला. त्यानंतर गौतमीनेही प्रगती यांना केक भरवत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी गौतमी पाटील यांचा डान्स पाहण्यासाठी जिल्ह्यातील अनेक ठिकाणांहून तरुणांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती.
