कोळवाडे येथे क्रांतीसूर्यांच्या जयंती उत्साहात साजऱ्या
बिरसा मुंडा व राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त ग्रामस्थांचा मोठा सहभाग
संगमनेर
दिनांक १५ नोव्हेंबर रोजी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त तसेच क्रांतीसूर्य राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त कोळवाडे ग्रामस्थांनी अभूतपूर्व उत्साहात हा कार्यक्रम साजरा केला. दोन महान आदिवासी जलनायकांच्या स्मृतिदिनाने गावात देशभक्तीचा आणि सामाजिक एकोपा वाढवणारा संदेश दिला.
आदिवासींचे ‘धर्मगुरू’ व स्वाभिमानाचे प्रतीक – बिरसा मुंडा
बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी रांची जिल्ह्यातील उलिहाडू येथे झाला. मुंडा परंपरेनुसार त्यांना ‘बिरसा’ हे नाव देण्यात आले. त्यांचे वडील सुगना मुंडा तर आई कर्मी हातू. जन्मानंतर कुटुंब रोजगाराच्या शोधात उलिहाडूवरून करू बंडा येथे स्थायिक झाले. अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात बिरसा मुंडा यांनी आदिवासींचे हक्क, जंगल-जमिनीवरील अधिकार व स्वाभिमानासाठी प्रखर लढा उभा केला. ‘उलगुलान’ या ऐतिहासिक आंदोलनातून त्यांनी जनतेमध्ये नवचैतन्य जागवले. म्हणूनच ते आदिवासी समाजाचे धर्मगुरू, जलनायक आणि क्रांतीसूर्य म्हणून जगभर ओळखले जातात.
राघोजी भांगरे – अहिल्याबाईंच्या प्रदेशातील शौर्यगाथा
क्रांतीसूर्य राघोजी भांगरे यांनी ब्रिटिशांविरुद्ध आंदोलनाचे ज्योत प्रज्वलित करून स्वातंत्र्यलढ्याला वेग दिला. त्यांच्या स्मरणातून आजही समाजात देशभक्तीची ऊर्जा निर्माण होते.
ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
जयंती निमित्त कोळवाडे गावात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन, वी.आय. चेअरमन, सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, गावातील सर्व ग्रामस्थ, महिला विकास गट, तरुण वर्ग आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरात देशभक्तीपर गीतांचा निनाद, प्रेरणादायी भाषणे आणि आदिवासी नायकांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची शोभा वाढली.
ग्रामस्थांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला वैशिष्ट्यपूर्ण रूप प्राप्त झाले. दोन महान क्रांतीसूर्यांच्या जयंतीदिनी कोळवाडे गावाने एकतेचा, सामाजिक बांधिलकीचा व परंपरेचा सुंदर संदेश दिला.
