राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त आदर्श शिक्षककळसकर गुरुजी प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर:

संगमनेर (प्रतिनिधी) :-

राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त आदर्श शिक्षक सोमनाथ कळसकर गुरुजी प्रतिष्ठानतर्फे यावर्षीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले असून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणी शिक्षकांना हे मानाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.

यामध्ये राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार गडचिरोलीचे श्रीकांत काटेलवार यांना जाहीर झाला आहे. सामाजिक कार्यात योगदान देत समाजप्रबोधनाचे काम सातत्याने केल्याबद्दल त्यांची निवड करण्यात आली आहे.

राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार अकोलेच्या रमेश खरबस यांना जाहीर झाला असून शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कामाची दखल घेण्यात आली आहे.

राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार संगमनेरच्या निता शिवाजी सावंत यांना जाहीर केला आहे. अध्यापनातील गुणवत्ता, नवे प्रयोग आणि विद्यार्थ्यांशी असलेले सुसंवाद यामुळे त्यांची निवड झाली आहे.

तर दुसरा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार अहिल्यानगरच्या सोहनी पुरनाळे यांना जाहीर झाला असून त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची प्रतिष्ठानने दखल घेत गौरव केला आहे.
सोबतच कळसकर गुरुजी प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कारही तीन शाळांना जाहीर करण्यात आले आहेत.
शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात बहुआयामी कार्य करणाऱ्या ग्रामीण भागातील तीन शाळांची निवड करण्यात आली आहे.
संगमनेर तालुक्यातील पोखरी हवेली आणि विरभद्रनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळांनी विविध उपक्रमांद्वारे शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आधुनिक अध्यापन पद्धती, स्वच्छ व सक्षम शैक्षणिक परिसर, तसेच नवोदय उपक्रमांमुळे या शाळांनी आदर्श शाळा पुरस्कारासाठी पात्रता सिद्ध केली आहे.

अकोले तालुक्यातील कळस बु. या जिल्हा परिषद शाळेची निवडही या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी झाली आहे. सर्वसमावेशक शिक्षण, मुलांच्या क्रीडा व सांस्कृतिक विकासासाठी राबवलेल्या अनेक उपक्रमांची प्रतिष्ठानने दखल घेत त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

या तीनही शाळांना राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार जाहीर होताच शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून लवकरच होणाऱ्या सत्कार समारंभात शाळांना मानाचा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
या सर्व पुरस्कार विजेत्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत असून ७ डिसेंबर २०२५ रोजी पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते व पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांचे प्रमुख उपस्थित सन्मानपूर्वक सत्कार समारंभात सर्व पुरस्कारार्थिंना सन्मानित करण्यात येणार आहे.अशी माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्राचार्य ज्ञानेश्वर गोंटे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!