कुटुंबाचा आधारवड… एक आदर्श पिता हरपला!
“वाटले नव्हते असे विपरीत घडून येईल… चालता-बोलता देव तुम्हाला घेऊन जाईल!
माणुसकी, माया-ममता, प्रेम यांची चर्चा झाली की पहिली आठवण ज्या व्यक्तीची येते… तो म्हणजे आमचे दादासाहेब!”
अंभोरे या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या छोट्याशा खेड्यात १६ मार्च १९६० रोजी कै. सावळेराम आणि कै. मुक्ताबाई खेमनर यांच्या पोटी जन्मलेले दादासाहेब उर्फ भाऊसाहेब सावळेराम खेमनर लहानपणापासून शांत, संयमी, कष्टाळू पण अत्यंत कुशाग्र बुध्दीचे होते. पाचव्या वर्षीच वडिलांच्या निधनाने पितृछत्र हरपले आणि आई मुक्ताबाईंच्या खांद्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी येऊन पडली. गरिबीच्या चटके सोसत शिक्षण केवळ पाचवीपर्यंत घेता आले; पण त्यांच्यातील पुढाकार, कर्तव्यनिष्ठा आणि आईला मदत करण्याची ओढ यांनी त्यांना लहानपणापासूनच परिपक्व केले.
संसाराची गाठ आणि संघर्षमय आयुष्य
सन १९८३ मध्ये गळनिंब येथील प्रगतशील शेतकरी कै. माधव कडनोर यांच्या कन्या सौ. रखमाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. संसाररूपी रथात दोघांनी जिद्दीने, समजुतीने, एकमेकास साथ देत जीवनाचा प्रवास सुरु केला. शरद, बाबासाहेब आणि अर्चना अशी तीन गुणी अपत्ये त्यांनी उमलवली.
पण आयुष्याने पुन्हा कसोटी घेतली—दादासाहेबांना लहानपणीच दमा झाला. या कठीण काळात मेहुणे श्री. आण्णासाहेब कडनोर यांनी बहिण व मेहुण्याला भाऊ म्हणून खंबीर आधार दिला. उपचार, डॉक्टर, औषधोपचार यामध्ये कितीही खर्च झाला तरी कुटुंबाने हार मानली नाही. या सगळ्यातही दादासाहेबांनी धैर्य, आशा आणि विश्वास सोडला नाही.
धार्मिक, सामाजिक आणि मानवी मूल्यांनी घडलेले व्यक्तिमत्त्व
दादासाहेब यांना सद्गुरु स्वामी जनार्दन (मौणगिरी) महाराज व उत्तराधिकारी स्वामी शांतीगिरीजी महाराजांवरील भक्तीचा गहिरा प्रभाव होता. चिमाजी भागाची खेमनर , रावजी भागाजी खेमनर , म्हसू पाटील नाथाजी खेमनर आणि रभाजी किसन खेमनर यांच्यामार्फत त्यांना मिळालेल्या अध्यात्मिक संस्कारांनी त्यांचे जीवन अधिक तेजस्वी झाले. त्यांनी बाबाजींचा अनुग्रह घेतला आणि त्यांची भक्ती सुरू केली आणि जय बाबाजी भक्त परिवारातील एक घटक बनले आणि बघता बघता वीस ते पंचवीस वर्ष कसे निघून गेले ते समजलेच नाही
“आपली चिंता क्षणा-क्षणाला आहे सद्गुरु स्वामी जनार्दनाला”
हे त्यांचं जीवनसूत्रच बनलं.
त्यामुळेच त्यांची मुले—शरद व बाबासाहेब—आजही धर्म, सेवा, प्रामाणिकता आणि सामाजिक बांधिलकी यांचे जतन करत आहेत.
उत्कृष्ट पिता आणि आदर्श मार्गदर्शक
शरद आज कुशाग्र विधीज्ञ म्हणून संगमनेर न्यायालयात परिचित नाव आहे. बाबासाहेब बडोदा बँक, अंभोरे शाखेत कार्यरत असून सेवाभावी वृत्तीमुळे ते जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण करून आहेत.
दादासाहेब यांच्या संस्कारांचा प्रभाव मुलांच्या प्रत्येक कृतीत उमटतो—शिस्त, प्रेम, संयम, आणि इतरांच्या दुःखात धावून जाणारी वृत्ती.
समाजकारणातला ठसा
गावात वाद न होता प्रेम, स्नेह, आपुलकी जपणारा एक मोठा मित्रपरिवार त्यांनी आपल्या वर्तनातून निर्माण केला. कोणताही राजकीय वारसा नसताना लोकनेते मा. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या विश्वासाने दादासाहेब यांची अंभोरे विविध कार्यकारी सोसायटीचे बिनविरोध चेअरमनपदी निवड—ही त्यांच्या प्रामाणिक स्वभावाची पोचपावतीच!
संचालक, कर्मचारी, सेवकवृंद यांच्या सहकार्यातून पाच वर्षे सोसायटीचा कारभार पारदर्शकपणे, स्नेहाने आणि यशस्वीपणे चालवला.
अंतिम अध्याय
दीपावलीचा आनंदमय सण सुरु असतानाच दादासाहेब यांची प्रकृती ढासळली. निमोनिया झाल्याने नाशिक ते संगमनेरपर्यंत सर्वोत्कृष्ट वैद्यकीय उपचार देण्यात आले. मुले—शरद आणि बाबासाहेब—वडिलांना वाचवण्यासाठी अहोरात्र जीवाची बाजी लावून धडपडत राहिले. पण नशिबाच्या लेखी काही वेगळेच होते…
२७ ऑक्टोबर २०२५ — दुपारी २.५०
या क्षणी दादासाहेबांनी अखेरचा श्वास घेत जगाचा आणि प्रियजनांचा निरोप घेतला. अंभोरे गावावर शोककळा पसरली. वस्तीवर पोहोचताच मुला-मुलींचा हंबरडा, पत्नीसाठी कोसळलेले आभाळ… हे दृश्य अत्यंत हृदय पिळवटून टाकणारे होते.
फुलांनी सजवलेल्या अमररथातून भजनी मंडळाच्या अभंगनादात पार्थिव अंभोरे अमरधामात नेण्यात आले. मुलगा शरद आणि मुलगी अर्चना यांनी मुखाग्नी देताना डोळ्यांतून ओघळणारे अश्रू त्यांच्या अंतःकरणातील वेदना सांगत होते.
“बाप” – कधीही न भरून येणारी पोकळी
“डोंगराआड गेलेला सूर्य परत उगवतो,
बाहेर गेलेला माणूस पुन्हा घरी येतो,
हरवलेली वस्तू सापडते…
पण मातीआड गेलेला ‘बाप’ पुन्हा कधीच दिसत नाही!”
पत्नी रखमाबाईंचे कुंकू हरपले…
मुलांचे सावलीरूपी वटवृक्ष उपटला गेला…
कुटुंबाचा आधारवड कोसळल्याने सारेच हतबल झाले.
दशक्रिया विधी
दशक्रिया विधी: शनिवार, दि. ०६ डिसेंबर २०२५
ठिकाण – देव नदी तीर, अंभोरे (ता. संगमनेर)
त्यांच्या पवित्र आत्म्यास देव चिरशांती देवो—हीच सर्वांची प्रार्थना.
कै. दादासाहेब उर्फ भाऊसाहेब सावळेराम खेमनर
यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र श्रद्धांजली…
शब्दांकन — श्री. सुभाषराव हळ्नोर, अंभोरे ता. संगमनेर जि. अहिल्यानगर
