“पुणे–नाशिक हायस्पीड रेल्वे अकोलेतून गेलीच पाहिजे” — सामाजिक कार्यकर्ते आत्माराम देशमुख यांची ठाम मागणी
संगमनेर l
नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला अकोले तालुका हा अहिल्यानगर जिल्ह्यासाठी जीवनवाहिनी ठरलेला आहे. या तालुक्यातून उगम पावणाऱ्या जलस्रोतांमुळे संपूर्ण जिल्ह्याला पाणीपुरवठा होऊन शेती, उद्योग व मानवी जीवन समृद्ध होत आहे. अशा विकासाचा पाया घालणाऱ्या अकोले तालुक्याला आजही मूलभूत दळणवळणाच्या सोयींपासून वंचित राहावे लागत असल्याचे चित्र आहे.
पुणे–नाशिक प्रस्तावित हायस्पीड रेल्वे प्रकल्प अकोले तालुक्यातूनच जावा, अशी ठाम व रास्त मागणी सामाजिक कार्यकर्ते आत्माराम गजानन देशमुख यांनी केली आहे. अकोले हा डोंगराळ व आदिवासीबहुल तालुका असून शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि बाजारपेठांशी जोडण्यासाठी जलद रेल्वे संपर्क अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
अकोले तालुका केवळ पाण्याचा उगम नसून पर्यावरण संतुलन, जैवविविधता व जलसंपदा संवर्धनात मोलाची भूमिका बजावत आहे. याच जलसंपदेमुळे अहिल्यानगर जिल्हा समृद्ध झाला असून, या कार्यामुळे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांना आशिया खंडात मोठा नावलौकिक मिळाला आहे. अशा पार्श्वभूमीवर त्यांनीच पुढाकार घेऊन पुणे–नाशिक हायस्पीड रेल्वे अकोलेतून नेण्याची जबाबदारी स्वीकारावी, अशी अपेक्षा देशमुख यांनी व्यक्त केली.
हायस्पीड रेल्वेमुळे अकोले तालुक्याच्या विकासाला गती मिळून पर्यटन, कृषीपूरक उद्योग, आदिवासी युवकांसाठी रोजगाराच्या संधी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीस चालना मिळेल. त्यामुळे हा प्रकल्प केवळ अकोलेसाठी नव्हे, तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाचा कणा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
अकोलेतील जनतेला प्रामाणिकपणे न्याय देण्याचे धोरण स्वीकारून हा मार्ग अकोलेतून निश्चित करावा, अन्यथा जनतेचा अपेक्षाभंग होईल, असेही देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले. पुणे–नाशिक हायस्पीड रेल्वे अकोलेतून गेलीच पाहिजे, ही अकोलेकरांची सामूहिक भावना असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
