“ज्ञानदानातून घडते समाजभान — रोहमवस्ती शाळेला विवेक बापट यांची पुस्तकरूपी देणगी”
संगमनेर (प्रतिनिधी) :
थोर कवी ग.दि. माडगूळकर (गदिमा) यांच्या “देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी” या काव्यपंक्तीची प्रचिती देणारा प्रेरणादायी प्रसंग आज जि. प. प्राथमिक रोहमवस्ती शाळेत अनुभवायला मिळाला. पुण्यातील दानशूर व्यक्तिमत्त्व श्री. विवेक बापट यांनी शाळेला तब्बल ९,००० रुपये किमतीची २१५ पुस्तके भेट देत ग्रामीण विद्यार्थ्यांच्या ज्ञानभांडारात मोलाची भर घातली.
रोहमवस्ती शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. सुनिता बेलोटे या नेहमीच शाळेसाठी विविध स्वरूपातील शैक्षणिक मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील असतात. त्याच प्रयत्नांतून त्यांना पुण्यातील श्री. बापट सर यांच्या सामाजिक कार्याची माहिती मिळाली. त्यांनी सरांशी पत्रव्यवहार केला आणि क्षणाचाही विलंब न करता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या माध्यमातून ज्ञानाची भेट देण्याचे उदात्त कार्य श्री. बापट सरांनी केले.
श्री. बापट सर व त्यांच्या परिवाराने यापूर्वीही अनेक शाळांना शैक्षणिक साहित्य, पुस्तके व विविध स्वरूपातील मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपली असून त्यांचा हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
या अनमोल पुस्तकरूपी भेटीचे शाळेत वितरण करण्यात आले. यावेळी शिक्षण तज्ज्ञ श्री. सुधाकर रोहम, एसएमसी अध्यक्ष श्री. संजय बागुल, राजहंस दूध संघाचे संचालक श्री. रवी रोहम,  जोर्वेकर, मुख्याध्यापिका सौ. बेलोटे मॅडम, सहशिक्षक श्री. आबासाहेब बिडगर यांच्यासह शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
या उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थांच्या वतीने श्री. विवेक बापट सर यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही पुस्तके निश्चितच दिशादर्शक ठरणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!