*सुधाकर टिळेकर यांची पुणे ते कन्याकुमारी सायकल सफर यशस्वी*.
निमगाव जाळी / अशोक गोसावी,
निमगाव जाळी ता.संगमनेर जि. अहिल्यानगर येथील सुधाकर टिळेकर यांनी पुणे ते कन्याकुमारी सायकल राईड यशस्वी १५५० किमी अंतर पार करत पर्यावरणाचा संदेश दिला इंडो अॅथलेटिक सोसायटी,पुणे आणि भ्रमंती ग्रुप रहाटणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे ते कन्याकुमारी सायकल राईड ही मोहीम २१ डिसेंबर २०२५ रोजी सुरू होऊन ३० डिसेंबर २०२५ रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाली.
या मोहिमेत पिंपरी-चिंचवड परिसरातील १४ सायकलिस्ट सहभागी झाले होते. रहाटणी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन या ऐतिहासिक मोहिमेला सुरुवात झाली. त्यानंतर ही सायकल राईड कराड, बेळगाव,येल्लापूर, मुरुडेश्वर, मंगळूर, थलासरी, गुरुवायूर, कोट्टायम, तिरुअनंतपुरम मार्गे कन्याकुमारी येथे संपन्न झाली.
या प्रवासात सायकलिस्टनी सुमारे १५५० किलोमीटरचे आव्हानात्मक अंतर यशस्वीरित्या पार केले.
“Save the Nature, Save the Future” ही या मोहिमेची मुख्य संकल्पना होती. या माध्यमातून पर्यावरण संरक्षण, प्रदूषणमुक्त वाहतूक, शारीरिक तंदुरुस्ती आणि शिस्तबद्ध जीवनशैली यांचा प्रभावी संदेश देण्यात आला.
या मोहिमेत निमगाव जाळीचे भूमिपुत्र व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेले सुधाकर टिळेकर यांचाही सक्रिय सहभाग होता.
कोविड काळात त्यांना समजले की आपली प्रतिकारशक्ती मजबूत असणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यासाठी नियमित व्यायामाची जोड आवश्यक आहे. याच विचारातून ते सायकलिंगकडे वळाले. सुरुवातीला ते दररोज १०–२० किलोमीटर सायकल चालवू लागले. हळूहळू सायकलिंगचा छंद जोपासला जाऊ लागला आणि आत्मविश्वास वाढत गेला. त्यानंतर त्यांनी टप्प्याटप्प्याने अंतर वाढवले आणि सायकलिंग हा केवळ व्यायाम न राहता आवड बनली.त्यानंतर त्यांनी पुणे–हंपी(६०० किमी), पुणे–पंढरपूर(२३० किमी), पुणे–शिवनेरी (१८० किमी) अशा अनेक सायकल राईड यशस्वीरीत्या पूर्ण केल्या असून ते युवकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी इंडो अॅथलेटिक सोसायटीचे गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ तसेच भ्रमंती ग्रुप रहाटणीचे संतोष नखाते, बाळासाहेब तांबे व संदीप गायकवाड सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या उपक्रमातून तरुण पिढीने व्यसनमुक्त जीवन, आरोग्यदायी सवयी, साहसाची आवड आणि पर्यावरणाविषयी जबाबदारी स्वीकारावी, असा संदेश देण्यात आला. मोबाईल व डिजिटल विश्वात अडकलेल्या तरुणांसाठी अशी मोहिम स्वतःची क्षमता ओळखण्याची, आत्मविश्वास वाढवण्याची आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देणारी ठरली आहे.
