संगमनेरकरांसाठी बिझनेस एक्सपो एक पर्वणीच – सौ. नीलम खताळ
बिझनेस एक्सपोचा नगरसेविका रचना मालपाणी व नीलम खताळ यांच्या हस्ते शुभारंभ
संगमनेर (प्रतिनिधी):
सर्व वयोगटातील नागरिकांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार विविध वस्तू, खाद्यपदार्थ व उपकरणे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारा सफायर बिझनेस एक्सपो संगमनेर करांसाठी एक पर्वणी ठरत असल्याचे गौरवोद्गार आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी व सामाजिक कार्यकर्त्या सौ. नीलम खताळ यांनी काढले.
लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायर च्या वतीने १५ ते २१ जानेवारी या कालावधीत मालपाणी लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसीय सफायर बिझनेस एक्सपोचे उद्घाटन संगमनेर नगरपालिकेच्या नूतन नगरसेविका रचना मालपाणी आणि नीलम खताळ यांच्या हस्ते झाले. यावेळी लायन्स क्लब सफायरचे संस्थापक उद्योगपती गिरीश मालपाणी, प्रकल्प प्रमुख प्रफुल्ल खिवंसरा, श्रीनिवास भंडारी, अध्यक्ष कल्याण कासट, सेक्रेटरी सुमित मणियार, खजिनदार नामदेव मुळे, स्टॉलधारकांचे प्रतिनिधी डॉ. सुरेंद्र महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.
संगमनेर नगरपरिषदेच्या नगर सेविका रचना मालपाणी म्हणाल्या, “नाविन्याची परंपरा जपल्यामुळेच १८ वर्षांनंतरही सफायर बिझनेस एक्सपो नवीन, ताजा व टवटवीत वाटतो. खरेदी, मनोरंजन आणि मेजवानी यांचा सुरेख त्रिवेणी संगम येथे अनुभवायला मिळतो. संगमनेर तालुका कृषी-संस्कृतीने समृद्ध असून सचोटीच्या संस्कारातील व्यापारी क्षेत्रामुळे येथे मोठी आर्थिक उलाढाल होते. एकाच ठिकाणी विविध उत्पादने पाहणे व खरेदी करणे शक्य होत असल्याने महिला वर्गासाठी हा एक्सपो वरदान ठरतो. यंदाही गर्दीचे उच्चांक प्रस्थापित होतील.”
उद्योगपती गिरीश मालपाणी यांनी सांगितले, “अठरा वर्षांच्या सलग अनुभवातून सातत्यपूर्ण सुधारणा केल्यामुळे राज्यभरातून स्टॉल बुकिंगसाठी मोठी वेटिंग लिस्ट असते. दरवर्षी सुमारे २५ टक्के नवीन स्टॉलधारक सहभागी होतात. नियोजनबद्ध जाहिरात मोहीम व प्रकल्प समितीची अडीच-तीन महिने केलेली मेहनत यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरतो. एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक्सपो प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देणारा पथदर्शक प्रकल्प आहे.”
यावेळी सफायरने तयार केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सर्व मान्यवरां च्या शुभहस्ते करण्यात आले. प्रकल्प प्रमुख श्रीनिवास भंडारे डॉ. सुरेंद्र महाडिक व डॉ. अमोल पाठक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्याण कासट यांनी केले, सूत्रसंचालन अतुल अभंग यांनी केले तर आभार कल्पेश मर्दा यांनी मानले
