आमच्याकडेही जोडे आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोटो आहेत : आ.बाळासाहेब थोरात यांचा सत्ताधाऱ्यांना इशारा
संगमनेर : लोकवेध live न्यूज 
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारण्याचा प्रकार सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर केला, हे अत्यंत हीन दर्जाचे राजकारण आहे. अशा पातळीवर उतरून सत्ताधारी पक्षाला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान,महागाई,बेरोजगारी यावरून लक्ष हटवता येणार नाही, आणि महाराष्ट्राशी केलेल्या गद्दारीचे पापही झाकता येणार नाही.आमच्याकडेही जोडे आणि तुमच्या नेत्यांचे फोटो आहेत एवढे लक्षात ठेवा, असा सणसणीत इशारा काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.
           भाजपा प्रणित शिंदे सरकारचा समाचार घेताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, आम्ही आजवर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे पालन केले आहे. परंतु ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असतात हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे. सभागृहाच्या पायऱ्यांवर आंदोलन करणे हा विरोधकांचा अधिकार आहे. आज आम्ही आंदोलने करतो, यापूर्वी आपणही पायऱ्यावर आंदोलने केली आहेत.या आंदोलनातून जनतेचे प्रश्न सरकार पुढे तीव्रतेने मांडून ते त्वरित सोडवावेत अशी आंदोलकाची मागणी असते. मात्र विधान भवनाच्या पायऱ्यावर गुरुवारी जो प्रकार घडला तो यापूर्वी कधीही घडला नसून लोकशाहीला कलंक लागेल अशी निंदनीय कृती झाली आहे. ज्या पद्धति ने खा. राहुल गांधी यांचा फोटो पायऱ्यावर लावला गेला आणि सदर फोटोला चपलाने मारण्याचा अविर्भाव करण्यात आला असे मागील कालखंडात कधीही झाले नाही. याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे.खासदार राहुल गांधी यांच्या फोटो बाबत विकृत कृती व वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नसून त्यांना सभागृहात बोलण्याचाही नैतिक अधिकार नाही. आंदोलनाच्या नावाखाली विकृत कृत्य करणाऱ्या वर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांच्या बाजूने लढणारे तुम्ही आम्हाला काय शिकवणार असा घनाघात करत आमदार बाळासाहेब थोरात यांनी सत्ताधारी पक्षाला खडे बोल सुनावले. शिंदे-फडणवीस सरकारमधील नेत्यांकडून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज,संत तुकाराम महाराज,महात्मा फुले यासारख्या थोर विभूती बाबत वादग्रस्त वक्तव्य सुरू असतात, अशी वक्तव्य करून त्यांनी सातत्याने महापुरुषांचा अपमान केला पण आजपर्यंत त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. महाराष्ट्रात राजकारणाचा दर्जा अत्यंत खालच्या पातळीवर आणण्याचे काम मागील काही वर्षापासून सुरू असून देशाला दिशा दाखवणाऱ्या महाराष्ट्राच्या परंपरेला हा कलंक असल्याचे आमदार थोरात यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!