▪️प. पू. गगनगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने रामकथा सत्संगाचे धर्ममंडप उभे राहिले :- ढोक महाराज

४५ हजार भाविकांनी केली खिचडी सेवन

संगमनेर { प्रतिनिधी }

प. पू. गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहातील रामकथेच्या आठव्या पर्वात रामायणाचार्य ढोक महाराज यांनी आपल्या ओजस्वी, अभ्यासपूर्ण, भावस्पर्शी निरूपणातून रामकथेचे विविध पैलू उलगडत भाविकांना कधी विरहाच्या वेदनेत तर कधी भक्ति रसाच्या अमृतधारेत चिंब भिजविले. त्यांच्या वाणीतील सात्त्विकता, विचारांची गूढता आणि कथनशैलीतील प्रभावामुळे संपूर्ण धर्ममंडप भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. गगनगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने उभे राहिलेले हे रामकथा सत्संगाचे धर्ममंडप संस्कार, भक्ती आणि अध्यात्माचे विद्यापीठच बनले असल्याचे त्यांनी सांगितले. रामानंदाचार्य, गोविंददेवगिरी महाराज, आत्मामलिक श्रीजंगलीसदगुरू महाराज यांच्यासह अनेक संत महात्म्यांच्या दर्शनाने आशीर्वादामुळे हा आध्यात्मिक सोहळा अधिक तेजस्वी आणि चैतन्यमय होत असून, त्यातून भाविकांना भक्ती, सदाचाराचा अमूल्य संदेश मिळत असल्याचे प्रतिपादन ढोक महाराज यांनी केले.
स्व. जयवंतराव व श्री बाळासाहेब गुंजाळ पाटील गुंजाळ मळा येथे परमपूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
ढोक महाराज यांनी परशुराम प्रसंगाचे वर्णन आणि महत्त्व सांगत अनेक पिढ्यांचा उल्लेख केला. भगवान परशुरामांनी राम लक्ष्मणांच्या तेज, आज्ञापालन व संस्कारांचे केलेले गौरवपूर्ण वर्णन त्यांनी प्रभावी शब्दांत उभे केले.
कैकयीच्या वरामुळे प्रभू रामांना वनवास भोगावा लागला आणि त्या वियोगाने राजा दशरथांनी अन्नत्याग केला, हा प्रसंग उलगडताना सभागृहातील अनेक भाविकांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. रामकथेतील चौथा दिवस हा वियोगाचा दिवस असतो असे सांगत त्यांनी भक्तांना भावविश्वात नेले. शुभ शकुनांचे महत्त्व स्पष्ट करताना नकुल, हरण, पूजा साहित्य घेऊन जाणारी व्यक्ती, कडेवर बाळ घेतलेली स्त्री, डोक्यावर हंडा घेऊन जाणारी महिला, शेतातील कावळे तसेच मासे विकणारा कोळी यांसारख्या उदाहरणांतून शुभ संकेतांचे विश्लेषण केले. अयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजनाचा प्रसंग वर्णन करताना कोरोना काळात होम हवन करण्याची संधी मिळाल्याने वेदपाठी ब्राह्मण कसे गहिवरून गेले, याचे भावपूर्ण चित्रण त्यांनी केले.
*मुलीचा पिता हा कधीही कमी नसतो*
जनकराजांच्या चार कन्यांच्या विदाईचा प्रसंग कथन करताना महाराज म्हणाले, मुलीचा पिता हा कधीही कमी नसतो; तो दाता असतो. कन्यादान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. सीता, उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती यांच्या विदाईचे वर्णन करताना शकुंतला -कण्वमुनी, पार्वती- हिमालय आणि जनकराज यांच्या विरहाची उदाहरणे देत त्यांनी प्रत्येक बापाच्या अंतर्मनातील वेदना शब्दबद्ध केल्या.

*मुहूर्ताचे जीवनातील महत्त्व*

मार्गशीर्ष महिन्यातील गोरज मुहूर्त, शुद्ध पक्ष पंचमी, गायीच्या खुराने उडणारी धूळ यांचे आध्यात्मिक महत्त्व सांगत वेळ आणि मुहूर्ताचे जीवनातील स्थान अधोरेखित केले. राम-सीतेच्या विवाहात काही क्षणांचा विलंब झाला असता तर चौदा वर्षांचा वनवास भोगावा लागला असल्याचे त्यांनी वेळेचे महत्त्व पटवून दिले.

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची टीका
—- सध्याच्या विवाह पद्धतीवर भाष्य करताना ढोक महाराजांनी मुहूर्ताकडे होणारे दुर्लक्ष, अनावश्यक खर्च, दिखाऊपणा आणि वधूपित्याला सहन करावा लागणारा मानसिक त्रास यावर परखड शब्दांत टीका केली. गावागावांत ‘दांडके मंडळ’ स्थापन करून विवाह सोहळ्यांमध्ये शिस्त राखण्यासाठी युवकांची पथके उभी करण्याची सूचना त्यांनी केली. तसेच गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या रामकथेच्या प्रसारासाठी संगमनेरच्या प्रसारमाध्यमांनी केलेल्या योगदानाचे विशेष कौतुक केले.
एकादशी निमित्त ४५ हजार भाविकांनी केली खिचडी सेवन !
–अधिक मासातील ज्येष्ठ कृष्ण कमला एकादशीच्या निमित्ताने ४५ हजार भाविकांनी खिचडीचा प्रसाद सेवन केला. संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर तालुक्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या कथेचे आयोजन गगनगिरी महाराज सप्ताह समितीच्या वतीने करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!