▪️भक्ती, कर्तव्य, मर्यादा म्हणजेच रामकथा ढोक महाराज
▪️रामायणाचार्यांच्या ओजस्वी वाणीतून सीता स्वयंवर बनले दिव्य सोहळा राम जानकी मिलनाने भाविक हरकून गले

संगमनेर

जीवनात ईश्वरनिष्ठा, सदाचार आणि संतसंगाचे महत्त्व अद्वितीय असून भक्ती कर्तव्य मर्यादा म्हणजेच राम कथा असल्याचे विशद करत
रामायणाचार्यांच्या ओजस्वी वाणीने सीता स्वयंवराचा प्रसंग जिवंतपणे उभा केल्याने भाविक मंत्रमुग्ध झाले. गुंजाळवाडी परिसरात
राम जानकी मिलनाच्या वर्णनाने भक्त हरखून गेले
गुंजाळवाडी येथील स्व. जयवंतराव व बाळासाहेब गुंजाळ यांच्या गुंजाळमळ्यात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित श्रीराम कथामालेत रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांनी सीता स्वयंवराचा प्रसंग अत्यंत रसाळ, ओजस्वी आणि भावस्पर्शी शैलीत उलगडून सांगितला. त्यांच्या वाणीतील प्रभावामुळे उपस्थित भाविकांना जणू जनकपुरीतील स्वयंवर मंडपात प्रत्यक्ष उपस्थित असल्याचा अनुभव आला.
राम-जानकी मिलनाचा प्रसंग ऐकताना अनेक भाविक भक्तिभावाने भारावून गेले.
कथेला प्रारंभ करताना महाराजांनी ब्रह्मदेवकन्या अहिल्येच्या उद्धाराचा प्रसंग उलगडला. प्रभू श्रीरामांच्या चरणस्पर्शाने अहिल्येला मिळालेली मुक्ती ही ईश्वरकृपेचे सर्वोच्च प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर विश्वामित्र ऋषींच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम जनकपुरीत पोहोचल्याचे वर्णन करत सीता स्वयंवराचा थरारक प्रसंग रंगविला.
शिवधनुष्याचे वर्णन करताना महाराज म्हणाले की, त्या दिव्य धनुष्यातून हजारो सूर्यांच्या तेजाप्रमाणे प्रकाश झळकत होता. श्रीरामांनी धनुष्याला स्पर्श करताच हिमालय, समुद्र, शेषनाग आणि पृथ्वीवर काय परिणाम झाला असेल, याचे चित्रण त्यांनी इतक्या प्रभावी शब्दांत केले की संपूर्ण मंडप रोमांचित झाला. धनुष्यभंगाचा प्रसंग ऐकताच जय श्रीराम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्याचे सांगताना महाराजांनी आजचा माणूस भौतिक सुखांच्या मागे धावत असला तरी अंतःकरणातील दुःख दूर होत नसल्याचे नमूद केले. जीवनात ईश्वरनिष्ठा, सदाचार आणि संतसंग यांचे महत्त्व अनन्यसाधारण असून याच मार्गाने जीवनाला खरा आनंद आणि समाधान प्राप्त होते असे त्यांनी सांगितले.
श्रीराम सूर्यवंशी तर श्रीकृष्ण चंद्रवंशी असल्याचा संदर्भ देत महाराजांनी सृष्टीचे नियोजन, मानवी शरीररचना आणि ईश्वरनिर्मितीच्या गूढतेवरही प्रकाश टाकला. कौसल्या, सुमित्रा आणि मंथरा यांसारख्या रामायणातील पात्रांच्या माध्यमातून त्यांनी जीवनमूल्यांचे महत्त्व विशद केले. तसेच रामकार्याशी संबंधित गवाक्ष, केसरी, वृषमुख यांसारख्या पराक्रमी सेनानींच्या योगदानाचाही उल्लेख केला.
रामकथेतील प्रत्येक प्रसंगातून भक्ती, कर्तव्य, मर्यादा आणि धर्माचरणाचा संदेश देत महाराजांनी भाविकांना अंतर्मुख केले. या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन गगनगिरी महाराज भक्तगण परिवार आणि समितीने केले. गुंजाळवाडीतील शंभर एकरामध्ये या ठिकाणी कृषी प्रदर्शन तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल. लहान मुलांसाठी खेळण्याची साधने तसेच हजारो भक्तगण बसतील अशी भोजन व्यवस्था. जप मंडपासह यज्ञ मंडपासही या ठिकाणी प्रबंध करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!