बँकांकडून अनुदानावर ‘होल्ड’; शेतकऱ्यांचा प्रश्न तापला

आ. खताळांनी अधिवेशनात सरकारला जाब विचारला

संगमनेर/ प्रतिनिधी

मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाने पुन्हा एकदा जोर धरला असून आमदार अमोल खताळ यांनी हा मुद्दा सभागृहात ठामपणे मांडत सरकारचे लक्ष वेधले. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन घेतले जाते; मात्र यंदा अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊनही शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई काही ठिकाणी अद्याप प्रलंबित आहे, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

आमदार खताळ यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, कांदा उत्पादनासाठी बियाणे, खत, औषधे, मजुरी यांसाठी मोठा खर्च करावा लागतो. परंतु बाजारात मिळणारा दर हा खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. उत्पादन खर्च वाढत असताना उत्पन्न घटत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. दरम्यान, महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात काही बँकांकडून शेतकऱ्यांच्या खात्यांवर ‘होल्ड’ लावून शासनाकडून येणारे अनुदान अडवले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांवरच अडथळा निर्माण होत असून त्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडत आहे.

या संदर्भात आमदार खताळ यांनी सरकारला जाब विचारत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. प्रलंबित नुकसान भरपाई लवकरात लवकर वितरित करावी, बँकांकडून सुरू असलेल्या अनुदान रोखण्याच्या प्रकारावर कठोर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी ठाम भूमिका त्यांनी सभागृहात मांडली. संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचा हा प्रश्न केवळ स्थानिक नसून राज्यातील इतर कांदा उत्पादक भागांसाठीही महत्त्वाचा ठरत असल्याने यावर लवकर तोडगा निघणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!